IPL 2021 RCB vs KKR Cricket Score : विराट कोहलीचा बंगळुरु आणि इयान मॉर्गनच्या कोलकातामधील आयपीएल सामन्यात बंगळुरुनं सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. बंगळुरुनं कोलकात्यासमोर 205 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 166 धावांवर आटोपला.
205 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकात्याकडून एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. शेवटी आंद्रे रसेलनं काही आक्रमक फटके मारत आशा निर्माण केली मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. सुरुवातीला शुभमन गिलनं 9 चेंडूत 21 धावा केल्या तर राहुल त्रिपाठी 20 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर नितीश राणानं 11 चेंडूत 18 धावा केल्या. दिनेश कार्तिकला केवळ 2 धावा करता आल्या. कर्णधार इयान मॉर्गनने 23 चेंडूत 29 धावा केल्या. बंगळुरुकडून कायले जेमिसननं तीन तर चहल आणि हर्षल पटेलनं दोन दोन विकेट घेतल्या.
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगळुरुनं कोलकात्यासमोर 205 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर बंगळुरुनं कोलकात्यासमोर विजयासाठी 205 धावांचं लक्ष्य ठेवलं. जबरदस्त फार्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं 48 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. तर एबी डिव्हिलियर्सनं केवळ 34 चेंडूत 76 धावांची नाबाद खेळी केली. त्यानेही 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. बंगळुरुची सुरुवात तशी चांगली झाली नाही. कर्णधार विराट कोहली आणि रजत पाटिदार एकापाठोपाठ बाद झाले. विराट 5 धावांवर तर रजत पाटिदार एक धाव करुन बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं आधी देवदत्त पडिक्कलसोबत चांगली भागिदारी केली. मात्र देवदत्त पडिक्कल 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेल जोडीनं संघाला दोनशेच्या पार नेऊन ठेवले.