सातारा : दोन दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शन लोकांना मिळाले नाही तर कोरोनाग्रस्तांसह मातोश्रीवर ठाण मांडणार असल्याचा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. ते साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सदाभाऊ खोत म्हणाले की, महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे कोरोनाचा मृत्यू दर वाढत आहे. या मृत्यूला जबाबदार ठाकरे सरकार आहे, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, इतर राज्यांनी रेमडेसिवीरचा साठा केला आहे. ठाकरे सरकारने फक्त दुसऱ्या लाटेचा धिंडोरा पिटला आहे. डीपीसीटीतला पैसा आपल्या पक्षातले आमदार, आपले कार्यकर्ते पालकमंत्री यांनी आपापल्या मतदार संघात वाटून खाल्ला. ग्रामीण विकास अंतर्गत 20–20 कोटीचा फंड राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या आमदारांना दिला. हेच पैसे लोक वाचवण्यासाठी करायला पाहिजेत होते, असा आरोप सदाभाऊ खोतांनी केला.
खोत म्हणाले की, रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपलब्ध आहे. औषध खात्याच्या माध्यमातून राज्य सरकारने भूमिका घेतली की आम्हीच खरेदी करणार. हे इंजेक्शन एखाद्या कंपनीने प्रायवेट मेडिकलला दिली तर त्याला दम दिला. या कंपनीला साडे सहाशे रुपयाला इंजेक्शन मागत होते आणि दुकानदार बाराशे रुपयांने खरेदी करायला तयार होते. मात्र त्यांना खरेदी करुन दिली नाहीत. याचे कारण औषध निर्माण मंत्र्याला यातून खंडणी गोळा करायची होती. राज्य सरकारचं कमिशन आणि औषध निर्माण मंत्र्यांचे कमीशन न ठरल्यामुळे, खंडणी न मिळाल्यामुळे हे इंजेक्शन मिळत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले की, एका कंपनीला इंजेक्शन दिले म्हणून त्याला उचलून आत टाकले. ओएसडी हा मंत्र्याचा नातेवाईक आहे. हा खंडणी गोळा करणारा खंडणीखोर आहे. मृत्युला जबाबदार धरुन औषध निर्माण मंत्र्यावर 302 दाखल करणार का? असा सवाल त्यांनी केला. त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी दबावाखाली ठेवून रेमडेसिवीरचा साठा केला आहे. जवळच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पालकमंत्री इंजेक्शन देतात, असंही खोत म्हणाले.
मंगळवारी रयतक्रांती संघटना गावागावात या खंडणीखोरांचे पुतळे जाळणार आहे. मढ्याच्या टाळूवरच लोणी खाणं बंद करा. ठाकरे सरकारला सांगतो की, ही रेमडेसिवीर इंजेक्शनची ही कोंडी काढा नाही तर मातोश्रीवर कोरोनाग्रस्तांसह ठाण मांडणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.