PBKS vs MI, IPL 2021 : चेन्नईत सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात पंजाबने मुंबईवर 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईनं कोलकात्यासमोर 132 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी दमदार भागीदारी करत 17.4 षटकातच विजय मिळवला.
132 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी 53 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली. त्यानंतर मैदानात आलेल्या ख्रिस गेल आणि केएल राहुलने 79 धावांची भागीदारी करत विजय मिळवला. राहुलने 52 चेंडूत 60 धावा केल्या तर ख्रिस गेलने 35 चेंडूत 43 धावा केल्या.
फलंदाजांची फ्लॉप कामगिरी पुन्हा एकदा मुंबईसाठी डोकेदुखी ठरली आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव वगळता कुणालाही चांगली खेळी करता आली नाही. मुंबईने पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला. पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने फक्त 21 धावा केल्या. सुरुवातीला मुंबईचा सलामीवीर क्विंटन डि कॉकला केवळ तीन धावा करुन बाद झाला. पॉवरप्लेनंतर ईशान किशनही बाद झाला. त्यानं 17 चेंडूत केवळ सहा धावा केल्या.
ईशान किशन बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमारला सोबत घेऊन रोहित शर्मानं डाव सावरला. 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार यादव ख्रिस गेलकडे झेल देऊन बाद झाला. सूर्यकुमारने 3 चौकार आणि एका षटकारासह 33 धावा केल्या. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद झाला. रोहितने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 63 धावा केल्या.
हार्दिक पंड्या या सामन्यातही अपयशी ठरला. हार्दिकला केवळ 1 धावेवर अर्शदीपने बाद केले. शेवटच्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर कृणाल पंड्या 3 धावांवर बाद झाला. पोलार्डनं एका षटकाराच्या मदतीनं नाबाद 16 धावा केल्या.