नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद हा वाद कित्येक वर्ष चालला. अखेर गेल्यावर्षी यावर तोडगा निघाला आणि राम मंदिराच्या निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. मात्र हा वाद सुरु असताना शंकराचार्यांपासून ते श्री श्री रविशंकर यांच्यापर्यंत अनेकांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले. या मुद्द्यावर अभिनेता शाहरुख खान राममंदिर प्रकरणी मध्यस्थी करणार होता, अशी माहिती समोर आली आहे.
आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या निवृत्ती समारंभाच्या वेळी हे गुपित उघड झालं आहे. बार एसोसिएशन अध्यक्ष विकास सिंह यांनी ही माहिती दिली. सिंह म्हणाले की, "राम मंदिर प्रकरणी मध्यस्थता करण्यासाठी जस्टिस बोबडे हे शाहरुख खानचा समावेश करु इच्छित होते. त्यांच्या सांगण्यावरुन मी शाहरुख खानशी चर्चा देखील केली. तो देखील इच्छुक होता. मात्र मध्यस्थता पुढे जाऊ शकली नाही.
8 मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सुनावणीत चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेत तीन सदस्यीय मध्यस्थता समितीची गठीत केली होती. या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती खलीफुल्ला होते. श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला.
2019च्या नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं हिंदुंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन त्या पक्षाला सोपवली तर मुस्लीम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर पाच एकर जमीन मशिद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय देखील घेतला.
5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम सोहळा केला गेला. कोरोनाचा काळ असल्याने 'श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 175 जणांना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.