पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना उद्या मंगळवेढा आणि पंढरपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एकाच दिवशी 6 प्रचारसभा होत आहेत. भाजप तरी कोरोनाचे नियम पाळून सभा घेणार का? याकडे मतदार आणि निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी अजित पवार यांनी घेतलेल्या सभेत कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले गेले होते. 


उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभा देखील अजित पवार यांनी सभा घेतलेल्या ठिकाणीच होत असून पहिली सभा मंगळवेढा तालुक्यातील बोराळे या गावात सकाळी 9 वाजता होणार आहे. दोन दिवसापूर्वी अजित पवार यांनीही येथेच सभा घेतली होती आणि गावातील 8 रुग्ण पॉसिटीव्ह आले होते. आता फडणवीस यांच्या दौऱ्याची सुरुवातही याच बोराळे गावातून होत असल्याने चिंता वाढणार आहेत. यानंतर फडणवीस सकाळी 10 वाजता नंदेश्वर, 11 वाजता डोंगरगाव व 12 वाजता मंगळवेढा शहरात सभा होणार आहेत.


Pandharpur By-election : पंढरपुरात प्रचारसभांचा जोर अन् कोरोना रुग्णवाढही जोरात!


यानंतर भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या निवासस्थानी भोजन करून दुपारी दोन वाजता पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे व 3 वाजता गादेगाव येथे प्रचार सभा घेणार आहेत. दौऱ्यातील शेवटची सभा दुपारी चार वाजता पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मंदिर येथे पटांगणात होणार आहे. सध्या भाजप व राष्ट्रवादीमध्ये काट्याची टक्कर असल्याने दोन्ही बाजूने नेत्यांची फौज प्रचारात उतरली आहे. यामुळे दोन्ही तालुके प्रचाराच्या निमित्ताने ढवळून निघत असल्याने कोरोनाचा फैलाव देखील मोठ्या प्रमाणात वाढायचा धोका आहे. 


सध्या पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी रोज कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून पंढरपूरमध्ये आज 161 नवीन रुग्ण झाल्याने येथील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 857 झाली आहे. मंगळवेढ्यात देखील आज 35 नवीन रुग्ण सापडले असून येथील उपचार घेणाऱ्यांची संख्या 296 झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. यातच रोजच्या सभा आणि प्रचारामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्यानेही पोटनिवडणूक रद्द करावी अशी मागणी अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांनी केल्याने खळबळ माजली आहे. बिचुकले यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही मागणी करीत निवडणूक रद्द न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.