IPL 2021  अवघ्या काही दिवसांनीच म्हणजेच 9 एप्रिलपासून इंडियन प्रिमीयर लीग, अर्थात आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. पण, क्रिकेटचा महाकुंभ सुरु होण्यापूर्वीच यामध्ये सहभागी झालेल्या दिल्लीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण, संघातील ऑलराऊंडर म्हणून ओखळ असणारा खेळाडू अक्षर पटेल याला कोरोनाची लागण झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं. 


दिल्ली कॅपिटल्स संघाशी संलग्न सुत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार अक्षर पटेलला दुर्दैवानं कोरोनाची लागण झाली असून, आता तो विलगीकरणात आहे. तसंच सर्व नियमांचं पालनही करत आहे. 


10 एप्रिलला दिल्लीचा पहिला सामना 


आयपीएल 2021 मध्ये दिल्लीच्या संघाचा पहिला सामना, 10 एप्रिलला होणार आहे. चेन्नईच्या संघाविरोधात हा सामना खेळला जाणार असल्याचं कळत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे हा सामना पार पडेल. पण, या सामन्याला अक्षर पटेल मात्र अनुपस्थित असणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. 


दिल्लीच्या संघाचं वेळापत्रक 


10 एप्रिल, चेन्नई विरुद्ध दिल्ली 
15 एप्रिल, राजस्थान विरुद्ध दिल्ली 
18 एप्रिल, पंजाब विरुद्ध दिल्ली 
20 एप्रिल, मुंबई विरुद्ध दिल्ली 
25 एप्रिल, हैदराबाद विरुद्ध दिल्ली 
27 एप्रिल, बंगळुरू विरुद्ध दिल्ली 
29 एप्रिल, कोलकाता विरुद्ध दिल्ली 
2 मे, पंजाब विरुद्ध दिल्ली 
8 मे, कोलकाता विरुद्ध दिल्ली 
11 मे, राजस्थान विरुद्ध दिल्ली 
14 मे, बंगळुरू विरुद्ध दिल्ली 
17 मे, हैदराबाद विरुद्द दिल्ली 
21 मे, चेन्नई विरुद्ध दिल्ली 
23 मे, मुंबई विरुद्ध दिल्ली 


IPL 2021 Viral Video | राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू रुमचा कॅमेरा बंद करायला विसरला अन्...


दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या हंगमात दोन संघांचे कर्णधार बदलण्यात आले आहेत. तर सहा संघांच्या कर्णधारांनी मागील हंगामातही संघाचं नेतृत्व केलं होतं. राजस्थान रॉयल्सने यावेळी संजू सॅमसनला संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथने संघांचं नेतृत्व केलं होतं. मात्र यावर्षी त्याला संघाने रिलीज केलं आहे.  त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.