IPL 2021 CSK vs RR : चेन्नई आणि राजस्थान  या दोन संघांमध्ये आज मुंबईच्या वानखेडे  मैदानावर सामना रंगला. या सामन्यात चेन्नईने बाजी मारली आहे. चेन्नईने राजस्थानला 188 धावांचे  टार्गेट दिले होते. हे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानला फक्त 143 धावांची मजल मारता आली.  राजस्थानचा या हंगामातील हा दुसरा पराभव आहे. चेन्नईने या विजयाने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 


 नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी  करताना राजस्थानसमोर 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या. चेन्नईच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. मात्र प्रत्येक खेळाडूने छोट्या खेळी करत संघाला चांगली धावसंख्या उभारुन दिली आहे. मनन वोहरा आणि जोस बटलर यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. 30 धावांची भागीदारी केल्यानंतर सॅम करनने वोहराला बाद केले. राजस्थानकडून जोस बटलर (49) धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये राजस्थानने 2 बाद 45 धावा केल्या.


चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी चेन्नईच्या डावाची सुरुवात केली.  ऋतुराज 10 धावांवर बाद झाला. यानंतर प्लेसिसने 17 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 33 धावा करत बाद झाला.  पहिल्या 6 षटकात चेन्नईने 2 बाद 46 धावा केल्या. त्यानंतर मोईन अलीने थोडी फटकेबाजी केली, मात्र अली 26 धावांवर बाद झाला. यानंतर  सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांनी  45 धावांची भागीदारी केली. चेतन साकारियाने एकाच षटकात रायुडू आणि रैनाला बाद केले. रैनाने 18 तर रायुडूने 27 धावा केल्या. 



त्यानंतर 200 वा सामना खेळणारा कर्णधार धोनी मैदानात आला मात्र तो  18 धावा काढून तो माघारी परतला. धोनीनंतर जडेजा 8 धावांवर बाद झाला. शेवटच्या 8 चेंडूंमध्ये ब्राव्होने 20 धावा करत संघाला 188 धावांवर पोहोचवले. राजस्थानकडून चेतन साकरियाने 3, मॉरिसने 2 तर, मुस्तफिजुर आणि तेवतिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.