CSK vs MI, IPL 2021 Highlights: दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात चेन्नईनं उभा केलेला धावांचा डोंगर पोलार्डच्या धमाकेदार 87 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईनं सर केला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईनं अखेर बाजी मारली. पोलार्डसह रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, क्रुणाल, हार्दिक पांड्यानंही धावांचा डोंगर पार करण्यास हातभार लावला. 


मुंबईच्या सलामीवीरांनी 2019 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली करुन दिली. रोहित शर्मानं 24 चेंडूत 35 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवही 3 धावांवर बाद झाला. तर क्विंटन डी कॉकनं 28 चेंडूत 38 धावा केल्या. मुंबईचा संघ अडचणीत आलेला असताना पोलार्ड आणि क्रुणाल पांड्यानं डाव सावरला. पोलार्डनं आपला रुद्रावतार दाखवत यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक केवळ 17 चेंडूत झळकावलं. त्याला क्रुणालनं 32 धावा करत चांगली साथ दिली. क्रुणाल बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्यानंही 7 चेंडूत 16 धावा करत तडाखेबाज खेळी केली. 


शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला 16 धावा विजयासाठी हव्या होत्या. एनगीडीच्या या षटकात पोलार्डनं दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. तिसऱ्या चेंडूवरही पोलार्डनं चौकार लगावला. चौथ्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. पाचव्या चेंडूवर पोलार्डनं शानदार षटकार लगावला. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती. या चेंडूवर दोन धावा घेत मुंबईच्या विजयावर पोलार्डनं शिक्कामोर्तब केलं. पोलार्डनं 34 चेंडूत 8 षटकार आणि 6 चौकारांसह 87 धावा केल्या. 


त्याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईनं मुंबईसमोर 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अंबाती रायुडू, मोईन अली, फाफ डू प्लेसिसच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर चेन्नईनं चार विकेट्स गमावून 218 धावा केल्या. चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर ऋतुराज गायकवाड 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या मोईन खाननं फाफ डू प्लेसिसच्या जोडीनं चांगली खेळी केली. मोईन अलीने 36 चेंडूत 58 धावा केल्या. त्याने पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. तर फाफ डू ने 28 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने 4 षटकार आणि 2 चौकार लगावले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाला केवळ 2 धावा करता आल्या. मात्र अंबाती रायुडूने मुंबईच्या गोलंदाजांना धुवुन काढले. अंबाती रायुडूने केवळ वीस चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. त्याने आपल्या खेळीत 27 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 72  धावांची खेळी केली. त्याला रविंद्र जाडेजानं चांगली साथ दिली. जाडेजा 22 धावांवर नाबाद राहिला.