मुंबई : वाढत्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार आहे. मुंबईसह राज्यात कोरोना केसेस वाढत असताना एकमेव यजमान शहर मुंबई ठेवणे योग्य राहणार नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढील इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेसाठी चार ते पाच ठिकाणांचा विचार करीत आहे.
यापूर्वी वानखेडे, ब्रेबोर्न, डीवाय वाय पाटील आणि मुंबईतील रिलायन्स स्टेडियमवर जैव-सुरक्षित वातावरण निर्माण करून आठ आठवड्यांपर्यंत चालणार्या स्पर्धेचे आयोजन करणे योग्य ठरेल, अशी चर्चा होती. पण, आता महाराष्ट्रात कोविड -19 च्या घटनांमध्ये वाढ झाल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “आयपीएल सुरू होण्यास अजून एक महिना शिल्लक आहे. परंतु, निश्चितपणे काही निर्णय घेण्याचे बाकी आहेत. मुंबई शहरात आयोजन करणे धोकादायक असेल कारण तिथे कोरोना मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. त्यामुळे हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता यासारख्या शहरे प्रारंभीचा सामना ठेवण्यास तयार असतील. अहमदाबादमध्ये आयपीएलचे प्ले ऑफ आणि अंतिम सामने होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलचा 14 वा हंगाम एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात सुरू होईल. कोरोना साथीच्या रोगामुळे मागील वर्षी युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते.