सोलापूर : सोलापूरच्या करमाळा तालक्यातील पोथरे इथल्या उषा पंडित झिंजाडे या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मळणी यंत्राच्या शाफ्टमध्ये डोकं अडकल्याने तिचं शीर धडापासून वेगळं होऊन जागीच मृत्यू झाला. हा प्रकार आज (26 फेब्रुवारी) दुपारी घडला.


सध्या सर्वत्र सुगीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून पोथरे इथेही सुगीचं काम गतीमान आहे. पोथरे इथले शेतकरी पंडित झिंजाडे, मुलगा अनिकेत झिंजाडे आणि पत्नी उषा झिंजाडे हे तिघेजण मळणी यंत्रावर ज्वारी करत होते. ज्वारी मळणीचं काम जवळपास संपत आलं असताना मळणी यंत्राखाली पडलेले भुसकट काढण्यासाठी उषा झिंजाडे या वाकून भुसकट काढत होत्या. त्यावेळी ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र ज्या ठिकाणी जोडले जाते त्या शाफ्टमध्ये उषा झिंजाडे यांच्या डोक्याचे केस अडकले आणि शाफ्टसोबत त्यांचं डोकं फिरुन ते शरीरापासून वेगळे झाले.


काही समजण्याच्या आत ही दुर्घटना घडली. त्यामुळे त्यांच्या पती आणि मुलालाही काहीच करता आलं नाही. दरम्यान उषा झिंजाडे यांच्या मागे पती, मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.