INDvsENG 3rd Test : मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवशी भारताने इंग्लंडला 10 गडी राखून पराभूत केले. दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणतीही विकेट न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र अजूनही भारताला अंतिम तिकीट मिळलेलं नाही.


इंग्लंडला 10 विकेट्स राखून पराभूत करुन भारताने 71.0 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये 64.1 गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. या टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 69 टक्के गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. यापूर्वी अंतिम तिकीट मिळवणारा न्यूझीलंड 70 टक्के गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.


अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला काय करावं लागेल?


आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जाण्यासाठी आता इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेची चौथी आणि अंतिम कसोटी जिंकणे किंवा ड्रॉ करणे भारताला आवश्यक आहे. जर इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी गमावली तर ही मालिका 2-2 अशी बरोबर होईल. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत भारताला चौथ्या कसोटीतील पराभव टाळावा लागेल.


IND vs ENG 3rd Test: नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा दमदार विजय; इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव


इंग्लंड अंतिम शर्यतीतून बाहेर


भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यानंतर इंग्लंड आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर झाला आहे. आता जर इंग्लंडने भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या चौथ्या कसोटीतही विजय मिळवला तरी तो अंतिम सामन्यात प्रवेश करू शकणार नाही. मात्र इंग्लंडच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीसाठी तिकीट मिळणार आहे.


भारतचा 10 विकेट्सनी विजय


कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 112 धावा केल्या. यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 145 धावा करू शकला. अशाप्रकारे पहिल्या डावात भारताने 33 धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणताही गडी न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 25 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 25 धावा काढल्या तर शुभमन गिलने 21 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावांवर नाबाद राहिला.


INDvsENG 3rd Test : अक्षर पटेलने रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा गोलंदाज


अक्षर पटेल भारतीय संघाच्या विजयाचा हिरो


भारताच्या या शानदार विजयाचा अक्षर पटेल नायक ठरला. आपला दुसरी कसोटी सामना खेळताना अक्षर पटेलने या कसोटीच्या दोन्ही डावात पाच विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने 38 धावा देऊन सहा विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात त्याने 32 धावा देऊन पाच बळी घेतले. यासह, तो दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे.