IPL 2020 SRH vs KXIP : सनरायजर्स हैदराबादने दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ 132 धावांवर गारद झाला. पंजाबकडून निकोलस पुरनने एकहाती संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. निकोलसने 77 धावा केल्या. तर हैदराबादच्या राशिद खानने 4 षटकांत 12 बाद 3 गडी बाद केले.


हैदराबादने दिलेलं 201 धावांच लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. मयांक अग्रवाल, लोकेश राहुल आणि प्रबसिमरन सिंह हे सलामीचे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतले. मात्र, यानंतर वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनने संघाचा डाव सावरत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. आयपीएलमध्ये आपलं पहिलं अर्धशतक झळकावणाऱ्या पूरनने 17 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. मात्र, निकोलसला कोणाचीही साथ मिळाली नाही. पंजाबचा संपूर्ण संघ 16.5 षटकात 132 धावांवर गारद झाला. निकोलस व्यतिरिक्त के एल राहुल आणि सिमरन सिंह या दोघांनाच दोनअंकी धावसंख्या उभारता आली.


IPL 2020 : धोनीचा सुपरकॅच; फिटनेसबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर


तत्पूर्वी, आयपीएलच्या तेराव्या हंगामात दुबईच्या मैदानावर सनराईजर्स हैदराबाद संघाला 201 धावांवर रोखण्यात पंजाबचे गोलंदाज यशस्वी ठरले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी 160 अभेद्य धावांची भागीदारी केली. हे दोघे मैदानावर खेळत असताना हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत चांगलं पुनरागमन केलं. हैदराबादला 201 धावांवर रोखलं.


डेव्हिड वॉर्नरने 40 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा काढल्या. तर त्याचा साथीदार जॉनी बेअरस्टॉने तर पंजाबच्या गोलंदाजांना धू-धू धुतले. त्याने 55 चेंडूत सात चौकार आणि सहा षटकारांमध्ये 97 धावा केल्या. अवघ्या तीन धावांनी जॉनीचं शतक हुकलं. हे दोघे बाद झाल्यानंतर मात्र, कोणालाही काही खास करता आलं नाही. पंजाबकडून फिरकीपटू रवी बिश्नोईने 3 गडी बाद केले. एकाच षटकात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या फलंदाजांना माघारी धाडत त्याने पंजाबला सामन्यात पुनरागमन करुन दिलं. यानंतर अर्शदीप सिंहनेही मोक्याच्या क्षणी दोन बळी घेत हैदराबादच्या धावगतीवर अंकुश लावला. तर मोहम्मद शमीने एक विकेट काढली.