नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी 74 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. "पप्पा... तुम्ही या जगात नाहीत पण मला माहित आहे की तुम्ही जिथे आहात सदैव माझ्यासोबत आहात' असं ट्वीट चिराग पासवान यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम विलास पासवान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, आपल्या देशात कदाचित कधीच भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. राम विलास पासवानजी यांचे निधन वैयक्तिक हानी आहे. मित्र, आणि गरीबांना सन्मानपूर्वक जीवन प्रदान करण्यासाठी झटणारा मौल्यवान सहकारी मी गमावला आहे. रामविलास पासवानजी कष्टाने आणि दृढनिश्चयातून राजकारणात उदयाला आले होते. युवा नेते असताना त्यांनी आणीबाणीच्या काळातील अत्याचार आणि लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रतिकार केला. ते उत्कृष्ट संसदपटू आणि मंत्री होते, अनेक धोरणात्मक क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान होते. पासवानजी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा अतुल्य अनुभव होता. कॅबिनेट बैठकांदरम्यानचे त्यांचे विचार समजूतदारपणाचे होते. राजकीय बुद्धिमत्ता, शासकीय मुद्यांवरील मुत्सद्दीपणात ते अतिशय हुशार होते. त्यांचे कुटुंब आणि समर्थकांप्रती सहवेदना. ओम शांती.
राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं की, रामविलास पासवान यांच्या निधनाची बातमी ऐकूण दु:ख झाले आहे. गरीब-दलित वर्गाने राजकीय बुलंद आवाज गमावला आहे. मी त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्वीट करुन शोक व्यक्त केला. "केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवानजी यांच्या निधनाने दुःख झाले. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवानजी यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती, त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे."