मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी आज ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समितीने राज्यभरात तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले. मुंबईतील अंधेरी येथे देखील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं. यावेळी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे प्रमुख प्रकाश शेंडगे आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. जोपर्यंत सरकार ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार नाही हे स्पष्ट करत नाही तोपर्यंत आशा प्रकारची आंदोलने राज्यभरात सुरूच राहतील असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी यावेळी दिला आहे.


या प्रश्नावर लवकरच आपण शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट घेणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हंटल आहे. सध्या राज्यभरात काहीजण ओबीसी विरुद्ध मराठा वाद जाणूनबुजून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजातील त्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातून दिलं जाणार नाही याबाबत स्पष्टता द्यावी. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.


अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासाठी मातोश्रीवर मशाल मोर्चा, विनायक मेटेंची एबीपी माझाला माहिती


याबाबत अधिक बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या राज्य सरकारकडून ऐकल्या जातात. अगदी एका समाजासाठी नोकरभरती थांबवून इतर समाजाचं नुकसान केलं जातं. मात्र, आमच्या ओबीसी मंत्र्यांचा आवाज मुख्यमंत्री आणि सरकारपर्यंत पोहोचत नाही. जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावले उचलली गेली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही. मराठा समाजातील काही संघटना, नेते मंडळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी करत आहेत. अशी मागणी करुन हे नेते महाराष्ट्रातलं सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत, असा घणाघात शेंडगे यांनी केला.


सध्या सगळ्या वर्गातील मुलं नोकरभरतीची वाट पाहत असताना सरकारने एका समाजासाठी नोकर भरती थांबवली. 13 टक्के जांगांसाठी 87 टक्के जागांची अडवणूक का केली? असा सवाल करत मराठा समाजाच्या 13 टक्के जागा बाजूला काढून इतर प्रवर्गातील मुलांची भरती करा, असं प्रकाश शेंडगे म्हणाले. काहीही झालं तरी ओबीसींच्या ताटातलं आम्ही मराठा समाजाला देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे आमचं देखील मत आहे. परंतु, ओबीसीवर अन्याय आम्ही सहन करणार नाही, असं ते म्हणाले. छत्रपतींचे वंशज फक्त मराठा समाजाच्या बाजून बोलतात, हे काही बरोबर नाही. वास्तविक त्यांनी सगळ्या समाजघटकांच्या प्रश्नांवर बोलणं अपेक्षित आहे, अशी अपेक्षाही यावेळी प्रकाश अण्णा शेंडगे यांनी व्यक्त केली.


OBC Reservation | आरक्षण बचावासाठी ओबीसी समाज रस्त्यावर, लक्ष्मण हाके पोतराजच्या वेशात सहभागी