नवी दिल्ली : एकीकडे बिहार निवडणुकीची धामधूम अजून संपलेली नसतानाच भाजपचं मिशन बंगाल सुरु होतंय. बिहारच्या प्रचारापासून दूर राहिलेले अमित शाह हे 5 नोव्हेंबरला दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर असणार आहेत. बंगालमध्ये पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होत आहेत. त्या दृष्टीनं भाजपच्या मिशन बंगालची रणनीती आखण्यासाठी अमित शाह हे बंगालमध्ये जाणार आहेत.



बांकुरा आणि कोलकाता या दोन्ही ठिकाणी भेट देऊन ते पक्षातल्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून प. बंगालच्या भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसीची चर्चा सुरु झाली आहे. मागच्या महिन्यात भाजपनं राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना जाहीर केली, त्यात बंगालमधून भाजपचे ज्येष्ठ नेते राहुल सिन्हा यांना वगळून तृणमूलमधून आलेले मुकुल रॉय यांना स्थान देण्यात आलं. मुकूल रॉय हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या काळात तृणमूलमध्ये नंबर 2 मानले जात होते. या सगळ्या निवडीनंतर बंगाल भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांमधल्या असंतोषाची चर्चा सुरु झाली होती. आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे बंगालचा दौरा करणार होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांच्याऐवजी थेट अमित शाहच बंगालमध्ये पोहचत असल्याचं भाजपच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे बंगालमधल्या संघटनात्मक बांधणीकडे वेळीच लक्ष देण्यासाठी भाजप गंभीर असल्याचा संदेशही दिला जातोय.


Bihar Election 2020 : बिहारच्या जनतेने घराणेशाहीला नाकारलं, जंगलराजचाही पराभव; पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा



अमित शाह यांच्या या दौऱ्याचं एका वेगळ्या अर्थानंही महत्व आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये अमित शाह हे दिल्लीच्या बाहेर फारसे पडलेले नाहीत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ते एकही दिवस हजर नव्हते. त्यानंतर बिहारच्या प्रचारात सुरुवातीला ते 12 सभा घेतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, बिहारमध्ये अमित शाह यांची एकही सभा झाली नाही. मात्र, आता भाजपच्या मिशन बंगालसाठी अमित शाह स्वत: मैदानात उतरतायेत. बंगालमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 42 पैकी 18 जागा जिंकल्या. त्यामुळे 2021 च्या विधानसभा निवडणुकीचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत भाजपनं आत्तापासूनच कंबर कसली आहे.