IPL 2020 KKR vs MI: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला 146 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं 6 षटकारांसह 80 धावांची खेळी केली. रोहितनं आयपीएल कारकीर्दीत 200 षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो आजवरचा चौथा फलंदाज ठरला. याआधी ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि महेंद्रसिंग धोनीनं आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.
सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे ख्रिस गेल. गेलने 326 षटकार लगावले आहेत. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स 214 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर तर एमएस धोनी 212 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता रोहित शर्मा 201 षटकारांसह चौथ्या स्थानी आहे. त्याखाली सुरेश रैना 194 तर विराट कोहली 190 यांचा नंबर लागतो.
IPL 2020 KKR vs MI: मुंबई इंडियन्सनं साजरा केला पहिला विजय, कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात
काल, मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला 146 धावांपर्यंत मजल मारता आली. कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 33 धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिक 30 आणि नितीश राणाने 24 धावा केल्या. मुंबईकडून पैटिनसन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. तर कायरन पोलार्डने एक विकेट घेतली.
मुंबईचा धावांचा डोंगर
रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं कोलकात्यासमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. रोहितनं कर्णधाराला साजेशी खेळी करताना 54 चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकारांसह 80 धावा फटकावल्या. त्यानं सूर्यकुमार यादवच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवनं 47 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे मुंबईला 20 षटकात पाच बाद 196 धावांचा डोंगर उभारता आला. कोलकात्याकडून शिवम मावीनं 32 धावा देत दोन विकेट्स घेतल्या.