IPL 2020, KKRvsRR : आयपीएलच्या 54 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 60 धावांनी पराभव केला. इयॉन मॉर्गन आणि पीट कमिन्स कोलकाताच्या विजयाचे हिरो ठरले. कोलकाताने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 131 धावाच करु शकला. या पराभवामुळे राजस्थान प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. तर कोलकाताचं प्ले ऑफमधलं आव्हान कायम आहे.


राजस्थानकडून जोस बटलरने 22 चेंडूत 35 धावांची खेळी केली. तर बेन स्टोक्सने 11 चेंडूत 18 धावा, श्रेयस गोपाळ 23 तर राहुल तेवातियाने 31 धावा केल्या. पीट कमिन्सच्या गोलंदाजीसमोर राजस्थानचे खेळाडू टिकू शकले नाहीत. कोलकाताकडून पीट कमिन्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शिवम मावी, वरुण चक्रवथीने प्रत्येक दोन तर कमलेश नागरकोटीने एक विकेट घेतली.


त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला 191 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. कोलकाताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर नितीश राणा पहिल्या षटकात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी दुसर्‍या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. गिल 24 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. शुभमन गिल बाद झाल्यानंतर कोलकाताचे तीन गडी बाद झाले. राहुल त्रिपाठी 24 चेंडूत 39 धावांवर बाद झाला. त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. दिनेश कार्तिकने पुन्हा आपल्या फलंदाजीने सर्वांना निराश केले. तोही खाते न उघडताच बाद झाला.


कोलकाताची अवस्था पाच बाद 99 असताना इयॉन मॉर्गनने राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने 35 चेंडूमध्ये नाबाद 68 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि सहा षटकार लगावले. याशिवाय आंद्रे रसेलनेही 11 चेंडूत 25 धावा केल्या. रसेलने एक चौकार आणि तीन षटकार लगावले. शेवटी कमिन्सनेही 11 चेंडूत 15 धावांची खेळी केली. राजस्थानकडून राहुल तेवतियाने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ 25 धावा देत तीन बळी घेतले. त्याशिवाय कार्तिक त्यागीने चार षटकांत 36 धावा देऊन दोन बळी घेतले.