श्रीनगर : सुरक्षा दलांना श्रीनगरमध्ये मोठं यश आलं आहे. सुरक्षा रक्षकांनी हिजबुल मुजाहिदीनचा महत्वाचा कमांडरला ठार मारला आहे. अनेक दहशतवादी हल्ल्यांबाबत सुरक्षा एजन्सी त्याचा शोध घेत होते. रियाज नायकू यांच्यानंतर सैफुल्लाला कमांडर बनविण्यात आले होते. श्रीनगरमधील एका घरात एक दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. सकाळी या कारवाई दरम्यान चकमकीत दहशतवादी ठार झाला.
काश्मीरचे आयजी म्हणाले, “आम्हाला काल रात्री श्रीनगरमधील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. ऑपरेशन सुरू करण्यात आल्यानंतर आज चकमकीदरम्यान त्याला गोळ्या घालण्यात आल्या. 95 टक्के खात्री आहे की तो हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख कमांडर आहे. एका संशयितासही अटक करण्यात आली. आमच्या सुरक्षा रक्षकांची ही मोठी कामगिरी आहे."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल त्या भागात शोध घेत होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. या चकमकीत दहशतवाद्यांपैकी एक ठार झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, अन्य दहशतवाद्याला घटनास्थळावरून अटक केली गेली आहे. चकमकीच्या ठिकाणी शस्त्रे आणि दारुगोळासह आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
सुरक्षा दलाकडून ऑपरेशन सुरु
खोऱ्यात दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा रक्षकांचे अभियान सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. इतकेच नव्हे तर दहशतवादी भीतीपोटी आत्मसमर्पण करत आहेत. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी शनिवारी सांगितले की, सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीच्या वेळी अतिरेकी आत्मसमर्पण करण्यास प्राधान्य देतात आणि हे स्वागतार्ह बदल आहे. ज्याने शस्त्रे हाती घेतले आहेत, त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परत यावे असे आवाहन त्यांनी केले.
शनिवारी डीजीपी म्हणाले, "गेल्या काही चकमकींमध्ये दहशतवाद्यांचे शरण येणे हा स्वागतार्ह बदल आहे. चकमकीदरम्यान, गोळ्या सुरू असतानाही भटकलेले तरुण पोलीस आणि सुरक्षा दलांना शरण येण्याच्या ऑफर स्वीकारत आहेत."
France Terror | फ्रान्समध्ये वादाची ठिणगी का पडली? पॅरिसमध्ये घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी काय?