कोलकाता : पुढील वर्षी मार्चमध्ये आयपीलचे 13 वे पर्व सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल कोलकात्यामध्ये भारतीय तसेच परदेशी खेळाडूंचा लिलाव पार पडला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा या लिलावातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं कमिन्सवर तब्बल 15.50 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी 10 कोटी 75 लाख रुपयांची बोली लागली. याचदरम्यान काही संघांनी आपले खेळाडू गमावले. तर काहींनी अंतर्गत बदलही केले आहेत.


किंग्स इलेव्हन पंजाब संघाने त्यांचा कर्णधार रवीचंद्रन अश्विनला दिल्ली कॅपिटल्सकडे सोपवलं आहे. त्यामुळे पंजाबने सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या टीम इंडियाचा सलामीवीवर के. एल. राहुलला कर्णधार बनवले आहे. किंग्स 11 पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली.


नेस वाडिया म्हणाले की, आम्ही सर्वप्रथम पाहिलं की, आमच्याकडे कोणकोणते पर्याय आहेत? त्यानंतर आम्ही त्यापैकी एकाची निवड केली. के. एल. राहुल गेल्या दोन वर्षांपासून आमच्या संघासोबत आहे. तो केवळ स्टार फलंदाच नाही तर तो जबाबदारी पेलण्यासही सक्षम आहे.


राहुलला 2018 च्या आयपीएल सीजनपूर्वी किंग्स 11 पंजाबने 11 कोटी रुपयांमध्ये आपल्याकडे खेचले होते. पंजाबसाठी सलामीवीराची भूमिका निभावणाऱ्या राहुलने 2018 च्या पर्वात 659 धावा कुटल्या होत्या. तर मागील वर्षी राहुलने 593 धावा फटकावल्या. दोन्ही वर्षी तो सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 10 यादीत होता. दोन्ही पर्वांमध्ये मिळून राहुलने 12 अर्धशतकं ठोकली आहेत. तर त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे पंजाबच्या संघाला यावर्षी राहुलकडून खूप अपेक्षा आहेत.


यशस्वी जैस्वाल झाला करोडपती
मुंबईचा युवा अष्टपैलू आणि भारताच्या अंडर नाईन्टिन संघाचा सदस्य यशस्वी जैस्वालवर आयपीएलच्या लिलावात तब्बल 2 कोटी 40 लाखांची बोली लावण्यात आली. राजस्थान रॉयल्सनं ती किंमत मोजून यशस्वीला आगामी आयपीएलसाठी आपल्या ताफ्यात सामील केलं. विशेष म्हणजे त्यानं अजूनही वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली नाही. दक्षिण आफ्रिकेतल्या अंडर नाईन्टिन विश्वचषकासाठी यशस्वीची भारतीय संघात निवड झाली आहे. यंदाच्या मोसमात यशस्वीनं विजय हजारे करंडकात द्विशतक झळकावलं होतं.


48 वर्षांचा प्रवीण तांबे केकेआरकडे
मुंबईचा अनुभवी लेग स्पिनर प्रवीण तांबेनं वयाच्या 48 व्या वर्षी आयपीएलच्या रणांगणातलं आपलं स्थान कायम राखलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला आगामी आयपीएलसाठी आपल्या संघात स्थान दिलं आहे. कोलकात्यानं तांबेला 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात सामील करुन घेतलं. प्रवीण तांबे हा सध्या 48 वर्षांचा आहे. त्यामुळं आयपीएलमध्ये खेळणारा तांबे हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार आहे. प्रवीण तांबेनं याआधीही आयपीएलच्या काही मोसमांत राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं होतं.


उनाडकटचा भाव घसरला
सौराष्ट्राचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला आयपीएलच्या लिलावात यंदा अवघी तीन कोटी रुपयांची बोली आली. राजस्थान रॉयल्सनं गेल्या मोसमासाठी उनाडकटला तब्बल साडेअकरा कोटींचा चढा भाव दिला होता. पण त्याच्या निराशानजक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर राजस्थाननं त्याला करारमुक्त केलं होतं. त्याच राजस्थाननं उनाडकटला यंदाच्या लिलावात तीन कोटी रुपयांत पुन्हा विकत घेतलं आहे.