IPL 2020, DCvsRR: दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव केला आहे. दिल्लीने दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 148 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीकडून शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांची अर्धशतकीय खेळी निर्णायक ठरली. दिल्लीचा हा सहावा विजय होता. 12 गुणांसह दिल्ली पॉईंट टेबलमध्ये नंबर वनवर पोहोचली आहे.


राजस्थानकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. तर संजू सॅमसन 25, रॉबिन उथप्पा 35, जोस बटलरने 22 धावांची खेळी केली. दिल्लीकडून तुषार देशपांडे, ऑनरीच नॉर्टजेने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. तर कसिगो रबाडा, आर अश्विन, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.


त्याआधी दिल्लीने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 162 धावांचं लक्ष्य दिलं. सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दिल्लीकडून अर्धशतकं ठोकली. तर राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चरने शानदार गोलंदाजी करत चार षटकांत 19 धावा देऊन तीन बळी घेतले.


सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉ खाते शुन्यावर बाद झाला. अजिंक्य रहाणेही 2 धावा करुन बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. धवनने 33 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी केली. त्याने सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले. तर श्रेयस अय्यरने 43 चेंडूत 53 धावा केल्या. अय्यरने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. अखेरच्या षटकात दिल्लीच्या धावांच्या गतीला ब्रेक लागला. मार्क्स स्टॉयनिसने 19 चेंडूत फक्त 18 धावा केल्या आणि अ‍ॅलेक्स कॅरीनेही 13 चेंडूत 14 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीचा संघ 20 षटकात केवळ 161 धावा करू शकला. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने तीन बळी घेतले. तर जयदेव उनाडकटने दोन, कार्तिक त्यागी व श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.