मुंबई : एरवी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम लागला की प्रत्येकजण टीव्हीसमोर बसतो. टीव्हीवर एकिकडे बच्चन साहेब बसलेले असतात.. दुसरीकडे स्पर्धक बसलेला असतो. तिसरीकडे प्रेक्षक आणि पुढचे स्पर्धक बसलेले असतात आण या सगळ्यात नेहमी सगळ्यांचं लक्ष असतं ते एकाच गोष्टीकडे. त्याचा आब इतका की दस्तूरखुद्द अमिताभ बच्चनही त्यांना अहोजाहो करतात. त्यांचं नाव कम्प्युटरजी. हेच कम्प्युटरजींनी ऐन कार्यक्रमात दहा मिनिटांसाठी विश्रांती काय घेतली.. केबीसीच्या कार्यक्रमात न भूतो.. अशी गंमत झाली.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा सध्या 12 वा सीझन सुरू आहे. त्यात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात ही गंमत घडली. पहिल्या पाटण्याच्या राज लक्ष्मी यांनी 12 लाख 50 हजार रुपये जिंकल्यानंतर त्यांनी हा डाव सोडला. त्यांच्या जागी आले मुंबईचे स्वप्नील चव्हाण. त्यांचं स्वागत अमिताभ बच्चन यांनी केलं. खेळाला सुरूवाझाली. पहिल्या प्रश्नाचं उत्तर स्वप्नील यांनी दिल्यानंतर 2 हजार रुपयांसाठी बच्चन साहेबांनी प्रश्न विचारण्याची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रश्न विचारायची तयारी झाल्यावर बच्चन यांनी कॉम्प्युटरला हुकूम दिला, दोन हजार रुपयों के लिये अगला सवाल.. यह रहा आपके सामने.. असं बच्चन म्हणाले खरं. पण कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर प्रश्नच आला नाही. बच्चन यांनी पुन्हा एकदा दो हजार रुपये के लिये सवाल असं म्हणाले. हे तीनदा झाल्यावरही कॉम्प्युटरवर काही प्रश्न येईना. मग मात्र बच्चन यांनी पाठीमागे आत बघत कॉम्प्युटर हॅंग झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले, कॉम्प्युटर तो अटक गया. काही क्षण गेले आणि बिग बी आणि स्वप्नील यांच्या स्क्रीनवर पुढचा प्रश्न अवतरला. हे सगळं नाट्य काही सेकंदांचं होतं. पण केबीसीच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं.
हे सगळं नाट्य घडत जरी असलं तरी बिग बी अमिताभ बच्चन यांनी ती स्थिती अत्यंत योग्य पद्धतीने सांभाळली. त्यामुळे काही गडबड झाली नाही. बच्चन यांनी आपल्या नेहमीच्याच पद्धतीन हसत खेळत ती स्थिती नियंत्रणात आणली आणि पुढचा खेळ सुरू झाला. कौन बनेगा करोडपतीचे आजवर 12 सीझन झाले. कोणत्याही सीझनमध्ये कॉम्प्युटरजींनी असा घोळ केला नव्हता. हा शो संपल्यानंतर मजेमजेत बोलताना आपलं मानधन वाढवा असं बहुधा त्या कॉम्प्युटरला सांगायचं असावं असा विनोदही तयार झाला होता.