IPL 2020, DCvsCSK : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या मोसमात आज दिल्ली कॅपिटल्स चेन्नई सुपरकिंग्सशी भिडणार आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. महेंद्रसिंग धोनीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तीन फिरकीपटू मैदानात उतरवले होते. धोनीची ही रणनिती सफल ठरली होती आणि संघाला विजयही मिळाला होता. तर दिल्ली दुखापतीचं लागलेलं ग्रहण संपलेलं नाही. कर्णधार श्रेयस अय्यर मागील सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे अय्यर आजच्या सामन्यात दिसणार का हे देखील महत्त्वाचं असणार आहे.
धीम्या पिचवर धोनी वेगळा कर्णधार ठरतो. या पिचवर काय करावे हे धोनीला चांगलं माहित आहे. स्पर्धेत आता बहुतेक ठिकाणी धीमी खेळपट्टी पाहिली जात आहे. अशा परिस्थितीत चेन्नई इतर संघांवरही वर्चस्व गाजवू शकते. चेन्नईकडे रवींद्र जाडेजा, पियुष चावला, करण शर्मा, इम्रान ताहिर हे चार दिग्गज फिरकीपटू आहेत. ताहिरला चेन्नईने अद्याप खेळवलेलं नाही. त्याचवेळी ड्वेन ब्राव्हो आणि शेन वॉटसनसुद्धा अशा खेळपट्ट्यांवर अत्यंत धोकादायक सिद्ध झाले आहेत.
सुरुवातीच्या सामन्यांमध्ये शारजाहच्या खेळपट्टीवर धावा करणे सोपं होतं. परंतु आता ही खेळपट्टी धीमी झाली आहे, जी चेन्नईसाठी फायदेशीर आहे. किमान गेल्या काही सामन्यात हे पाहिलं गेलं आहे. दिल्लीकडून शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि उर्वरित फलंदाज या परिस्थितीशी कसे सामोरे जातात हे पाहावं लागेल. शेवटच्या सामन्यात कर्णधार श्रेयर अय्यर जखमी झाला होता. त्यामुळे दिल्लीची कर्णधारपदाची धुरा शिखर धवनने सांभाळली आहे.
श्रेयस अय्यर फिट आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे अय्यर बाहेर पडल्यास दिल्लीचे मोठे नुकसान होईल. संघ आधीच अमित मिश्रा, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या दुखापतीमुळे अडचणीत आहे. अमित मिश्रा आणि ईशांत आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. ऋषभ पंतबाबतही परिस्थिती स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, अॅलेक्स कॅरी, शिमरन हेटमायरची जबाबदारी वाढते.
दिल्लीत रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल देखील धीम्या खेळपट्ट्यांचा फायदा घेण्यासाठी चांगले खेळाडू आहेत. त्याचवेळी वेगवान गोलंदाजीमध्ये कॅगिसो रबाडा आणि एनरिक नोर्खिया या जोडीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. तुषार देशपांडेने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पदार्पण केले आणि चांगली कामगिरी करण्यात यशस्वी झाला. त्यामुळे आता अय्यर फिट नसेल तर त्याच्याजागी कोण हा प्रश्न दिल्लीसमोर असेल.