यवतमाळ : नातवाला वाचण्यासाठी आजीनं जीवाच्या आकांताने बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण तर वाचवलेच मात्र त्या बिबट्यालाही पिटाळून लावले.  62 वर्षीय झुंझार धुरपताबाई  सातलवाड असं या बहादूर आजीचं नाव आहे. त्यांनी नातवावर चाल करून आलेल्या हिंसक बिबट्याला कडवी झुंज देऊन परतवून लावले आहे.  नातवाला वाचविण्यासाठी आजीने बिबट्याशी झुंज दिल्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे .


जिल्ह्यातील उमरखेड  तालुक्यातील चालगणी येथील धुरपताबाई  सातलवाड या आठ वर्षाचा नातू रितेश सोबत त्यांच्या शेतातील सोयाबीन काढण्यासाठी गेल्या होत्या. सोबत ताडपत्री, टोपलं घेऊन शेतात जात होत्या. शेजारी शेतकरी दिगंबर सालेकर यांच्या शेतात ऊस लावलेला आहे. त्याच ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रितेशवर चाल करून हल्ला केला.


त्यावेळी कोणतीही भीती न बाळगता आजी धुरपताबाईंनी हातातील टोपले बिबट्यावर मारले. चवताळलेल्या बिबट्याने नातवाला सोडून आजीवर हल्ला केला. आजीच्या गळ्यावर, छातीवर बिबट्याने पंजाने वार करत आजीच्या हाताचा लचका तोडला. आणि आजीचा हाथ पकडून तिला ओढायला लागला. त्यावेळी हिंमतवान आजीने कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता त्याच्याशी झुंज दिली. ही झटपट सुरू असतानाच आरडाओरड झाली. आरडाओरड झाल्याने शेतशिवारातील लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने बिबट्याने पळ काढला.


या हल्ल्यात जखमी झालेल्या आजीवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.  या हिंमतवान धाडसी आजीचे आता पंचक्रोशीत कौतुक होत आहे.