IPL 2020, DCvsCSK : दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सवर 5 विकेट्सनी मात केली आहे. शिखर धवन दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. शिखर धवनच्या शतकाच्या जोरावर दिल्लीचा विजय सोपा झाला. चेन्नईने पहिली फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 179 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने एक चेंडू राखून विजय मिळवला. चेन्नईवरील या विजयामुळे दिल्लीनं 14 गुणांसह गुणतालिकेत आपली जागा आणखी मजबूत केली आहे.
दिल्लीची चेन्नईच्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ खाते न उघडताच तंबूत परतला. यानंतर अजिंक्य रहाणेही पाचव्या षटकात केवळ 8 धावा करून बाद झाला. यानंतर शिखर धवनने चेन्नईच्या गोलंदाजांवर एकीकडून हल्ला सुरु ठेवला. दुसर्या विकेटसाठी त्याने श्रेयस अय्यरबरोबर महत्त्वपूर्ण 68 धावांची भागीदारी केली. मात्र अय्यर ब्राव्होच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात 23 धावांवर बाद झाला. यानंतर मार्कस स्टॉयनिसने आक्रमक पद्धतीने 14 चेंडूत 24 धावा केल्या. स्टॉयनिस बाद झाल्यानंतर एकवेळ दिल्लीने सामना हातातून गमावला असं वाटत होतं. मात्र अक्षर पटेलने 5 चेंडूत केलेल्या 21 धावा निर्णायक ठरल्या. अक्षर पटेलने त्यांच्या खेळी 3 षटकार लगावले.
शिखर धवनचं आयपीएलमधील पहिलं शतक
शिखर धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. यात त्याने 14 चौकार आणि एक षटकार खेचला. धवनचं आयपीएलमधील हे पहिलं शतक ठरलं. यंदाच्या मोसमात लोकेश राहुल, मयांक अगरवाल यांच्यानंतर शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. दीपक चहरने चेन्नईकडून उत्कृष्ट गोलंदाजी करत चार षटकांत केवळ 18 धावा देऊन दोन बळी घेतले. सॅम कुरन, शार्दुल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
त्याआधी चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र चेन्नईची सुरुवात खराब झाली. तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात सॅम करनला माघारी धाडलं. त्यानंतर फाफ डु-प्लेसिस आणि शेन वॉटसनने चेन्नईचा डाव सावरला. डु प्लेसिसने 47 चेंडूत 58 धावा केल्या. तर शेन वॉटसनने 36 धावा केल्या. अंबाती रायुडूने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत 25 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. रविंद्र जाडेजानेही त्याला उत्तम साथ दिली. रविंद्र जाडेजाने 13 चेंडूत 33 धावा केल्या. दिल्लीकडून ऑनरिज नॉर्जने 2 तर तुषार देशपांडे आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.