DC vs SRH, Qualifier 2: इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमात क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक मारली. या पराभवानंतर SRH चा कर्णधार डेविड वॉर्नर चांगलाच निराश झाला आहे. या पराभवाला त्यानं खराब क्षेत्ररक्षण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.


17 धावांनी झालेल्या पराभवानंतर डेविड वॉर्नर म्हणाला, जर आपण सामन्यात कॅच सोडत असू तर आपण मॅच जिंकू शकत नाही. मला वाटतं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आम्ही खराब सुरुवातीनंतरही सामन्यात वापसी केली होती. मात्र खराब क्षेत्ररक्षण आमच्या पराभवाचं कारण ठरलं.


विषेश म्हणजे या सामन्यात दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनिस या दोघांचेही झेल सुटले. धवनने 50 चेंडूत 78 तर स्टॉयनिसने 27 चेंडूत 38 धावा केल्या आणि संघाला मजबूत सुरुवात करुन दिली. पराभवानंतर निराश झालेल्या वॉर्नरनं आयपीएल 2020 चा प्रवास भन्नाट झाल्याचं म्हटलं आहे. तिसऱ्या स्थानी राहाणं अभिमानाची बाब असल्याचं त्यानं म्हटलंय. कारण कुणीही असा विचार केला नव्हता की आम्ही तिसऱ्या स्थानी राहू शकू.


दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदाचं फायनलमध्ये धडक मारली आहे. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने 20 षटकात 189 धावांचे लक्ष्य उभारले होते. प्रत्त्युतरात सनरायझर्स हैदराबादचा संघ 172 धावापर्यंतचं मजल मारु शकला.


दिल्ली कॅपिटल्सने दिलेलं 190 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादची सुरुवात अत्यंत वाईट झाली. सलामीची जोडी प्रियम गर्ग आणि कर्णधार डेविड वॉर्नर स्वस्तात परतले. मनिष पांडेही 21 धावांवर परतला. त्यानंतर आलेल्या केन विलियमसनने मात्र धुवांधार बॅटींग केली. त्याला काही काळ जेसन होल्डरने साथ दिली. मात्र, तोही 11 धावांवर तंबूत परतला. नंतर आलेल्या अब्दुल समदने मात्र विलियमसनला चांगली साथ दिली. दोघांनी मिळून दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. विजय समीप येत असतानचं विलियमसनची विकेट पडली. त्याने 45 चेंडूत 67 धावा केल्या. यात पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. विलियमसन बाद झाल्यानंतरही अब्दुलने विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. मात्र, तोही मोठे फटके मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने 16 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 33 धावा जमवल्या. राशिद खानने काही फटके मारले पण तोही झेलबाद झाला. त्याने 11 धावा काढल्या.


तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर मार्कस स्टोनिस आणि शिखर धवनने चांगली सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 8.२ ​​षटकांत 86 धावांची भर घातली. स्टॉयनिस 27 चेंडूत 38 धावांवर बाद झाला. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला.यानंतर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरने 20 चेंडूत 21 धावा केल्या. त्याने धवनबरोबर दुसर्‍या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. अय्यरच्या बाद झाल्यानंतर शिमरन हेटमायर फलंदाजीला आला आणि हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडले.हेटमायर आणि धवन यांनी 52 धावांची भागीदारी केली. 50 चेंडूत 78 धावा करून धवन पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याचवेळी हेटमायर 22 चेंडूत 42 धावा करून नाबाद राहिला. त्याच्या खेळीत हेटमायरने चार चौकार आणि एक षटकार लगावला.