अबुधाबी : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचं खापर स्पिनर गोलंदाजांवर फोडलं आहे. तसंच धोनीचं म्हणणं आहे की, क्वारंटाईन काळात 14 दिवस त्यांना सराव करायला मिळाला नाही. त्यामुळं संघाला नुकसान झालं असल्याचं धोनीनं म्हटलं आहे.


काल, बुधवारी राजस्थानने चेन्नईचा 16 धावांनी पराभव केला. राजस्थानने चेन्नईसमोर 217 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र चेन्नईला केवळ 200 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसिसने 72 धावांची खेळी केली. शेन वॉटसनने 33, मुरली विजयने 21, धोनीने , केदार जाधवने 22, तर सॅम कुर्रनने 17 धावा केल्या. त्याआधी नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.


आवश्यकता असताना धोनी सातव्या नंबरवर फलंदाजीस आला होता. यावरुन त्याच्यावर सवाल केले जात आहेत. यावर धोनी म्हणाला, मी खूप काळापासून फलंदाजी केलेली नाही. सोबतच 14 दिवस क्वारंटाईन असल्यानं सराव देखील व्यवस्थित होऊ शकला नाही. सॅम करनला संधी देत काही नवा विकल्प शोधू इच्छित होतो. फाफ ड्यू प्लेसिसनं खूप चांगली खेळी केली, असं धोनी म्हणाला. या सामन्यात धोनीनं तीन षटकारांसह 29 धावा केल्या.


राजस्थानने संजू सॅमसन, कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चरच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईसमोर 217 धावाचं आव्हान ठेवलं. सॅमसनने 32 चेंडूत 1 चौकार आणि 9 षटकारांसह 74 धावा केल्या. तर स्मिथनेही 69 धावा केल्या. तर शेवटच्या षटकात आर्चरने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 8 चेंडूत 27 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करनने 3, दीपक चहर-एन्गिडी आणि पियुष चावलाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.


संजू सॅमसनचं मोसमातील सर्वात जलद अर्धशतक


त्याआधी संजू सॅमसनने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं. आयपीएल 2020 मधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. सॅमसनने 32 चेंडूत एक चौकर 9 षटकारांसह 74 धावा केल्या. यासह सॅमसन आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी राजस्थानकडून 2018 मध्ये जॉस बटलरने 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तसेच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. याआधी केएल राहुलने 2019 मध्ये चेन्नईविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.


जोफ्रा आर्चरच्या दोन चेंडूत 27 धावा


राजस्थानची धावसंख्या 19 षटकात 7 गडी गमावून 186 होती. यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने शेवटच्या षटकात चेंडू लुन्गि एन्गिडीकडे सोपवला. एन्गिडीच्या पहिल्याच चेंडूवर आर्चरने जोरदार षटकार ठोकला. यानंतर पुढच्या चेंडूही आर्चर सीमेपलिकडे टोलवला. त्यानंतर एन्गिडीने पुढचा चेंडू नो बॉल टाकला. आर्चरनेही त्या चेंडूवरही षटकार ठोकला. अशा प्रकारे त्या चेंडूवर सात धावा निघाल्या. यानंतर एन्गिडीने पुढचा चेंडूही नो बॉलही टाकला, त्यावर आर्चरने पुन्हा षटकार मारला. अशा प्रकारे या चेंडूवर सात धावा निघाल्या. यानंतर एन्गिडीने वाइड बॉल टाकला. अशाप्रकारे, आर्चरने केवळ दोन चेंडूंमध्ये 27 धावा केल्या.