चेन्नई : महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएलच्या बाराव्या मोसमात विजयी सलामी दिली. चेन्नईनं विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पहिल्याच सामन्यात सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात बंगलोरनं चेन्नईसमोर विजयासाठी 71 धावांचं सोपं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईनं हे आव्हान 18 व्या षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. चेन्नईच्या अंबाती रायुडूनं सर्वाधिक 28 धावांची खेळी केली.


चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. चेन्नईकडून पार्थिव पटेलने 35 चेंडूत सर्वाधिक 29 धावा बनवल्या. पार्थिव पटेलशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा एकही खेळाडू दोन अंकी धावा करु शकला नाही.


IPL 2019 : संपूर्ण वेळापत्रक 


चेन्नईकडून हरभजन सिंगने आणि इम्रान ताहिरने सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा आणि ड्वेन ब्रावोने एक विकेट घेतली.


आयपीएलच्या इतिहासातील ही सहावी सर्वाधिक कमी धावसंख्या आहे. तर बंगलोरची दुसरी सर्वाधिक कमी धावसंख्या आहे. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोलकाता नाईट रायडर्स विरोधात 2017 मध्ये सर्वात कमी 49 धावा केल्या होत्या.


पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा रद्द


आयपीएलच्या बारा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. बीसीसीआयनं याआधीच आयपीएलचा उद्धाटन सोहळा रद्द करुन त्यासाठीची रक्कम सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यामुळे यंदाच्या दिमाखदार सोहळ्याऐवजी खास मिलिट्री बँडच्या गजरात आयपीएलची सुरुवात झाली. यावेळी मद्रास रेजिमेंटच्या बँडपथकानं आपलं कौशल्य सादर केलं.