उस्मानाबाद : शिवसेनेचे उस्मानबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा तिकीट कापल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच इतर कार्यकर्त्यांनी पकडल्यामुळे पुढचं अनर्थ टळले. बाबा भोसले असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.

शिवसेनेने काल (शुक्रवारी) आपली पहिली यादी जाहीर केली. यामध्ये उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून शिवसेनेचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली.

त्यानंतर रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये संताप व्यक्त केलं जातं होतं. याच पार्श्वभूमीवर उमरगा येथे रवींद्र गायकवाड यांच्या समर्थांकांनी मेळाळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी सभागृहात मोठ्याप्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. गायकवाड यांना डावलून ओम निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

व्यासपीठावरुन शिवसैनिकांनी ओम निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी बाबा भोसले नामक कार्यकर्त्याने आचानक अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असताना इतर कार्यकर्त्यांनी त्याला पकडले. यावेळी त्याने रवी गायकवाड यांना उमेदवारी न दिल्याने निषेधाच्या घोषणा दिल्या.

रवींद्र गायकवाड यांच्यावर नॉट रिचेबलचा ठपका ठेवत मातोश्रीवर त्यांना उमेदवारी देऊ नये म्हणून ओम निंबाळकर मागील काही दिवसांपासून तळ ठोकून होते. तरी रवी गायकवाड यांच्याबाबत फेरविचार करावा यासाठी उद्या काही शिवसैनिक मातोश्रीवर जाणार आहेत.

आगामी काळात रवींद्र गायकवाड काय भूमिका घेणार हे पाहणं ही महत्त्वाचं ठरणार आहे.