नवी दिल्ली: आयपीएलच्या चालू मोसमात सातत्याने अपयशी ठरणारा गौतम गंभीर, दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे.


गंभीरऐवजी आता श्रेयस अय्यर दिल्लीची धुरा सांभाळणार आहे.

आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने आतापर्यंतच्या 6 सामन्यांपैकी 5 सामने गमावले आहेत. सततच्या पराभवामुळे गंभीरने कर्णधारपदावरुन पायउतार होणं पसंत केलं.

सध्या दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाला आहे.

“सध्या आम्ही ज्या स्थानी आहोत, त्याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारतो. मी कर्णधारपदावरुन पायउतार होतोय. श्रेयस अय्यर नवा कर्णधार असेल. आम्ही संघ म्हणून आम्ही एकत्र असून, परिस्थिती बदलण्याची क्षमता या संघात आहे, असा माझा विश्वास आहे”, असं गौतम गंभीर म्हणाला.

दिल्लीने 6 पैकी केवळ एकचा सामना जिंकला आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्सचा पराभव करुन या विजयाची नोंद केली. याशिवाय गंभीरचा फॉर्मही कर्णधारपदाला साजेशा नाही. गंभीरने 6 सामन्यात केवळ 85 धावाच केल्या आहेत.

गंभीर सात वर्षांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या संघात परतला होता.

यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद भूषवत होता. गंभीरच्या नेतृत्त्वात कोलकाताने दोनवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं.

मात्र गंभीरला तोच फॉर्म दिल्ली संघासोबत कायम राखता आला नाही.