पर्थ : कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या जबाबदार फलंदाजीने पर्थ कसोटीत टीम इंडियाला दुसऱ्या दिवसअखेर तीन बाद 172 धावांची मजल मारुन दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी विराट 82 धावांवर तर रहाणे 51 धावांवर खेळत होता. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 90 धावांची अभेद्य भागीदारी रचली.

ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने टीम इंडियाची दोन बाद आठ अशी दाणादाण उडवली होती. पण विराटने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताच्या डावाला स्थैर्य दिलं. त्याने पुजाराच्या साथीने 74 धावांची भागीदारी रचली. पुजाराने 103 चेंडूंत 24 धावांची खेळी उभारली.

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला

त्याआधी, भारतीय वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांमध्ये आटोपला. भारताच्या ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि उमेश यादवने आजच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. त्यामुळे कांगारुंना कालच्या धावसंख्येत केवळ 49 धावांचीच भर घालता आली. ईशांतने सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर बुमरा, उमेश यादव आणि हनुमा विहारीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

पहिल्या दिवशी काय झालं?
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्कस हॅरिस, अॅरॉन फिन्च आणि ट्रॅव्हिस हेडने झळकावलेल्या अर्धशतकांनी पहिल्या दिवसअखेर 6 बाद 277 धावांची मजल मारुन दिली. ऑस्ट्रेलियाच्या हॅरिस आणि फिन्चने दिलेली 112 धावांची सलामी पहिल्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्ट्य ठरली. याच भागिदारीने ऑस्ट्रेलियाला डावाचा भक्कम पाया रचून दिला. मग शॉन मार्श आणि ट्रॅव्हिस हेडने पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 84 धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. हॅरिसने दहा चौकारांसह 70 धावांची, फिन्चने सहा चौकारांसह 50 धावांची, ट्रॅव्हिस हेडने सहा चौकारांसह 58 धावांची आणि शॉन मार्शने सहा चौकारांसह 45 धावांची खेळी उभारली.