पर्थ : भारतीय गोलंदाजांनी पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात चार बाद 132 धावांवर रोखून सामन्यात चुरस निर्माण केली आहे. कांगारुंना पहिल्या डावात मिळालेल्या 43 धावांची आघाडी जमेस धरता ऑस्ट्रेलियाकडे आता 175 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कांगारुंचा कर्णधार टिम पेन 8 तर उस्मान ख्वाजा 41 धावांवर खेळत आहे.

मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. शमीनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं तर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली.

विराट कोहलीच्या शतकानंतरही पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 283 धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 43 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं 123 धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण एका बाजून योग्य साथ न मिळाल्यानं भारताचा डाव कालच्या तीन बाद 172 वरुन सर्वबाद 283 असा गडगडला. ऑस्ट्रेलियाकडून लायनने 5  तर मिचेल स्टार्क 2 , जोश हेझलवूड 2 तर पॅट कमिन्सने एक गडी बाद केला.


विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतरही पर्थ कसोटीत टीम इंडियाला आघाडी घेता आली नाही. विराट कोहली आणि रहाणे वगळता एकाही खेळाडूला मोठी खेळी उभारता आली नाही. ऋषभ पंतने 36 तर हनुमा विहारीने 20 धावांचे योगदान दिले.


विराट कोहलीचं खणखणीत शतक हे आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्राचं वैशिष्ट्य ठरलं. विराटनं कसोटी कारकीर्दीतलं आपलं 25 वं शतक साजरं केलं. त्यानं 257 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकारासह 123 धावांची खेळी उभारली. पण दुसऱ्या बाजूनं योग्य साथ न मिळाल्यानं टीम इंडियाचा डाव 283 वर आटोपला.

कोहली-रहाणेच्या भागीदारीने भारताला सावरलं!
कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या जबाबदार फलंदाजीने पर्थ कसोटीत टीम इंडियाला दुसऱ्या दिवसअखेर तीन बाद 172 धावांची मजल मारुन दिली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी विराट 82 धावांवर तर रहाणे 51 धावांवर खेळत होता. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 90 धावांची अभेद्य भागीदारी रचली होती.

ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने टीम इंडियाची दोन बाद आठ अशी दाणादाण उडवली होती. पण विराटने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताच्या डावाला स्थैर्य दिलं. त्याने पुजाराच्या साथीने 74 धावांची भागीदारी रचली. पुजाराने 103 चेंडूंत 24 धावांची खेळी उभारली होती.

त्याआधी, भारतीय वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांमध्ये आटोपला. भारताच्या ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि उमेश यादवने आजच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. त्यामुळे कांगारुंना कालच्या धावसंख्येत केवळ 49 धावांचीच भर घालता आली. ईशांतने सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर बुमरा, उमेश यादव आणि हनुमा विहारीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.