Indonesia Masters 2022: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन (Lakshya Sen) यांनी गुरुवारी येथे आपापल्या सामन्यात विजय मिळवून इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. बँकॉकमधील थॉमस चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपदाच्या वेळी भारतीय संघाचा भाग असलेल्या अल्मोराच्या 20 वर्षीय लक्ष्य सेननं जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या रासमुस गेमकेचा 54 मिनिटांत 21-18, 21-15 असा पराभव केला. मात्र, सिंधूला महिला एकेरीत थोडा संघर्ष करावा लागला. तिनं एका तासाच्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्का टूनजुंगचा 23-21, 20-22, 21-11 असा पराभव केलाय.


पीव्ही सिंधू- लक्ष्य सेनचा पुढील सामना कोणाशी?
दरम्यान, लक्ष्य सेनचा पुढचा सामना चीनच्या चौ तिएन चेनशी होईल. ज्यानं गेल्या महिन्यात थॉमस चषकात दोन खेळाडूंमध्ये झालेल्या एकमेव सामन्यात भारताविरुद्ध तीन गेममध्ये विजय नोंदवला होता. तर, उपांत्यपूर्व फेरीत सिंधूसमोर कडवे आव्हान असेल. थायलंडच्या रत्चानोक इंतानोन आणि स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोर यांच्यातील सामन्यात विजय मिळवणाऱ्या खेळाडूशी सिंधूचा सामना होणार आहे. आपपल्या पुढील सामन्यात पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन कशी कामगिरी बजावतात? याकडं सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.


अश्विनी पोनप्पा आणि बी. सुमीत रेड्डीचं आव्हान संपुष्टात
महत्वाचं म्हणजे, मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि बी. सुमीत रेड्डी यांचं आव्हान संपुष्टात आलंय. चीनच्या झेंग सि वेई आणि ह्युआंग या क्विआँग जोडीनं हा सामना 21-18, 21-13 अशा फरकानं जिंकलाय.


हे देखील वाचा-