मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कोहलीने आयसीसी पुरस्कारांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. 'आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू 2018' म्हणून त्याची निवड झाली आहे. त्यामुळे तो सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीचा मानकरी ठरला आहे. यासोबतच विराट पहिल्यांदाच 'सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू' ठरला आहे. तर सर्वोत्कृष्ट एकदिवसीय किकेटपटू बनण्याची त्याची ही दुसरी वेळ आहे.

या पुरस्कारांसह विराटने अनोखी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. 30 वर्षीय विराट कोहली यंदाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू बनला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.






कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीच्या कसोटी आणि एकदिवसीय पुरुष संघाची घोषणा झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडे दोन्ही संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे.

कोहलीला कर्णधार बनवण्यामागचं कारणही आयसीसीने सांगितलं आहे. विराट कोहलीने 2018 मध्ये 14 वनडे सामन्यांत भारताचं नेतृत्त्व करताना 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर विराट कोहली कसोटीमध्ये 2018 साली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 13 कसोटी सामन्यात 55.08 च्या सरासरीने 1322 धावा केल्या आहेत.

आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ 2018 मध्ये भारताकडून कर्णधार विराट कोहलीसह रोहित शर्मा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराचा समावेश आहे.

असा आहे संघ : रोहित शर्मा (भारत), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), विराट कोहली (कर्णधार) (भारत), जो रुट (इंग्लंड), रॉस टेलर (न्यूझीलंड), जोस बटलर (यष्टीरक्षक) (इंग्लंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), मुस्तफिझुर रहमान (बांगलादेश), राशिद खान (अफगाणिस्तान) कुलदीप यादव (भारत), जसप्रीत बुमरा (भारत)


तर आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट कसोटी संघ 2018 मध्ये विराट कोहली, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमरा यांना स्थान मिळालं आहे.

असा आहे संघ : टॉम लॅथम (न्यूझीलंड), दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका), केन विल्यमसन (न्यूझीलंड), विराट कोहली (भारत) (कर्णधार), हेन्री निकोल्स (न्यूझीलंड), रिषभ पंत (यष्टीरक्षक) (भारत), जेसन होल्डर (वेस्ट इंडीज), कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया), जसप्रीत बुमरा (भारत), मोहम्मद अब्बास (पाकिस्तान)