लंडन: महिला क्रिकेट विश्वचषकात सांगलीची पोरगी स्मृती मानधनाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. स्मृतीच्या वादळी नाबाद शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज महिला संघावर तब्बल 7 विकेट्सने विजय मिळवला.

स्मृतीने 108 चेंडूत 13 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकत नाबाद 106 धावा ठोकल्या.

या सामन्यात भारताने प्रभावी क्षेत्ररक्षणाच्या जोरावर वेस्ट इंडिजचा डाव 50 ओव्हरमध्ये आठ विकेट्स घेत 183 वर गुंडाळला. स्मृती मंधानाच्या नाबाद 106 धावा जोरावर भारतानं 183 धावांचं लक्ष्य सहज पार केलं.



स्मृती मानधनाच्या या कामगिरीच्या जोरावर सध्या तिच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्मृतीला भारतीय महिला टीमची सचिन संबोधलं जात आहे.

टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग म्हणतो, "या शानदार विजयाबद्दल बीसीसीआयच्या महिला संघाचं अभिनंदन. स्मृती मानधनाची कामगिरी जबरदस्त. आपला संघ अशीच उत्तम कामगिरी करुन आपल्याला आनंद देत राहो हीच इच्छा"

https://twitter.com/virendersehwag/status/880454341898805249

माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणतो, "आणखी एका जबरदस्त विजयाबद्दल अभिनंदन, स्मृती तू लाजवाब खेळलीस"

https://twitter.com/VVSLaxman281/status/880455920014077957

तर विनय शेखावत नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये स्मृती मानधना ही भारतीय महिला संघाची सचिन तेंडुलकर असल्याचं म्हटलं आहे.

https://twitter.com/VinayShekawat/status/880471049300783107

कोण आहे स्मृती मानधना?

स्मृती श्रीनिवास मानधना मूळची सांगलीची. स्मृतीचा जन्म 18 जुलै 1996 रोजी मुंबईत झाला. ती सध्या अवघ्या 20 वर्षांची आहे.

स्मृती अवघ्या दोन वर्षांची होती, त्यावेळी तीचं कुटुंब सांगलीला स्थलांतरित झालं. स्मृतीला घरातूनच क्रिकेटचं बाळकडू मिळालं. स्मृतीचा भाऊ महाराष्ट्राच्या 16 वर्षाखालील संघातून खेळत होता. त्याला पाहूनच स्मृतीला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली.

आश्चर्य म्हणजे स्मृतीची फटकेबाजी इतकी जबरदस्त होती की, त्यामुळेच अवघ्या नवव्या वर्षी तिची निवड महाराष्ट्राच्या 15 वर्षाखालील मुलींच्या संघात निवड झाली.

इतंकच नाही तर दोनच वर्षात म्हणजे वयाच्या 11 व्या वर्षी, तिची चक्क 19 वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाली.

स्मृतीला क्रिकेटसाठी तिच्या कुटुंबातूनच पाठिंबा मिळत होता.  स्मृतीची फलंदाजी पाहून कोणीही तिला ही भारताचं भविष्य आहे, असंच म्हटलं असतं.



स्मृतीचे वडील श्रीनिवास हे केमिकल डिस्ट्रिब्युटर आहेत. त्यांनीच स्मृतीच्या क्रिकेटची काळजी घेतली. स्मृतीची आई स्मिता यांनी तिच्या क्रिकेटसाठी लागणारं साहित्य, कपडे, डाएट हे सर्व पाहिलं. तर स्मृतीचा भाऊ श्रवण आजही  तिला नेटमध्ये  गोलंदाजी करुन, तिच्या फलंदाजीचा सराव घेतो.

वनडे मध्ये द्विशतक ठोकणारी पहिली महिला

स्मृती मानधना ही वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला आहे. ऑक्टोबर 2013 मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना तिने गुजरातविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. अंडर 19 स्पर्धेत बडोद्यात झालेल्या या सामन्यात स्मृतीने झंझावती खेळी करत अवघ्या 150 चेंडूत नाबाद 224 धावा केल्या होत्या.

तीन अर्धशतक

2016 मधील वुमन्स चॅलेंजर ट्रॉफीत स्मृतीने 'इंडिया रेड' संघाकडून खेळताना तीन अर्धशतकं ठोकली होती. 'इंडिया ब्लू' विरुद्धच्या अंतिम सामन्यात तर स्मृतीने 62 चेंडूत 82 धावा ठोकून चषक जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

सप्टेंबर 2016 मध्ये स्मृतीने 'वुमन्स बिग बॅश लिग'मध्ये सहभाग घेतला होता. 'ब्रिस्बेन हीट' या संघासोबत एक वर्षासाठी ती करारबद्ध झाली होती. मात्र जानेवारी 2017 मध्ये एका सामन्यात खेळताना तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

स्मृतीच्या या दुखापतीमुळे भारतीय संघाची मात्र धाकधूक वाढली होती. कारण स्मृती तोपर्यंत भारताची स्टार फलंदाज झाली होती.

 वन डे संघात एण्ट्री

स्मृतीने 10 एप्रिल 2013 रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून भारताच्या वन डे संघात पदार्पण केलं. या सामन्यात तिने 25 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 46 धावांनी जिंकला होता.

कसोटी कामगिरी

स्मृतीने ऑगस्ट 2014 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केलं. या कसोटीत तिने दोन्ही डावात 22 आणि 51 अशा धावा करुन, भारताच्या विजयाला हातभार लावला.

वन डे शतक

स्मृतीने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त खेळी करुन पहिलं वहिलं शतक झळकावलं होतं. या सामन्यात तिने 109 चेंडूत 102 धावा कुटल्या होत्या.

जबरदस्त कामगिरीमुळेच स्मृतीची आयसीसीच्या महिला क्रिकेट संघात स्थान मिळालं होतं. आयसीसीच्या टीममध्ये स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.

विश्वचषकासाठी संघात निवड

'वुमन्स बिग बॅश लिग'मध्ये झालेल्या दुखापतीमुळे स्मृती सुमारे 5 महिने संघातून बाहेर होती. मात्र विश्वचषकासाठी ती फिट झाली आणि भारतीय फलंदाजीचा झंझावात स्मृतीच्या रुपाने संघात परत आला.



स्मृतीने आपली निवड सार्थ ठरवत विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध खणखणीत 90 धावा ठोकल्या. स्मृतीच्या दमदार खेळीमुळेच भारताने हा सामना 35 धावांनी जिंकला. स्मृतीच या सामन्याची मानकरी ठरली.

वेस्ट इंडिजविरुद्ध धडाकेबाज शतक

भारतीय महिला संघाचा विश्वचषकातील दुसरा सामना गुरुवारी वेस्ट इंडिजशी झाला. या सामन्यातही स्मृतीने आपला झंझावात कायम ठेवत 108 चेंडूत नाबाद 106 धावा ठोकल्या.

भारतीय फलंदाजीचा कणा

स्मृती मानधना ही सध्या भारतीय महिला संघाच्या फलंदाजीचा कणा बनली आहे. धडाकेबाज सुरुवात करुन, भारताला विजयापर्यंत पोहोचवण्याचं काम स्मृती करत आहे. सांगलीच्या या पोरीची कामगिरी अशीच राहिल्यास, भारतीय महिला संघ विश्वचषकावर नक्कीच नाव कोरेल असा विश्वास तमाम भारतीयांना आहे.