औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शिवसैनिकांनी खासगी क्लासेसच्या दोन शिक्षकांना जबर चोप दिला. आकाशवाणी चौकातील आकाश इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थिनींशी अश्लील बोलणाऱ्या, छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांना शिवसैनिकांचा बेदम चोप देत तोडफोड केली.


ब्रांच मॅनेजर शिवहरी वाघ आणि स्टाफ इन्चार्ज रोहित सुळ अशी या दोन शिक्षकांची नावं आहेत.
आकाशवाणी चौकाजवळील इमारतीत आकाश इन्स्टिट्यूट क्लासेस आहेत. इथे मेडिकल आणि इंजिनिअरिंग (नीट आणि जेईई) अभ्यासक्रमाचे क्लासेस घेतले जातात. गेल्या काही दिवसापासुन इथले शिक्षक बाहेर गावावरुन शिक्षणासाठी आलेल्या मुलींशी अश्लील बोलत होते. मात्र भीतीपोटी या मुली तक्रार करत नसत.

पण बुधवार एक मुलगी बॅचचा वेळ बदलून घेण्यासाठी गेली असता, तिच्या सोबत अश्लिल भाषेत बोलला. त्या मुलीने हा प्रकार घरी गेल्यावर भावाला सांगितला. त्यानंतर गुरुवारी शिवसैनिकांनी आकाश क्लासेसवर जाऊन तोडफोड करत या दोन शिक्षकांना बेदम मारहाण केली.

मारहाण करत असल्याची माहिती मिळताच चार्ली पोलिसांनी तात्काळ क्लासेसवर धाव घेत दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेऊन त्यांना जिन्सी पोलिस ठाण्यात नेले. त्यांनतर मुलीच्या तक्रारीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, शिक्षकाविरुद्ध तक्रार देण्यासाठी जिन्सी पोलिस ठाण्याता आलेल्या मुलीच्या आईला,  शिक्षकाने धमकी दिली. माझ्याविरुद्ध तक्रार केल्यास महागात पडेल, अशी धमकी मुलीच्या आईला दिली.