मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याची आज यो-यो टेस्ट होणार आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे 15 जूनला झालेल्या यो-यो टेस्टसाठी रोहित उपस्थित राहू शकला नव्हता. याबाबत त्याने बीसीसीआयकडून परवानगी घेतली होती.

सर्व खेळाडूंनी एकाच दिवशी ही टेस्ट दिली पाहिजे, असा कोणताही नियम नाही. रोहितने वैयक्तिक कार्यक्रम असल्याची कल्पना बीसीसीआयला दिली होती. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली.

रायुडूच्या जागी रैनाला संधी

यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्यानंतर अंबाती रायुडूला इंग्लडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागी अनेक दिवसांपासून संघाबाहेर असणाऱ्या सुरेश रैनाला संधी देण्यात आली. सुरेश रैनाचं तब्बल अडीच वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन होत आहे.

रायुडूला या फिटनेस चाचणीत पात्र ठरण्यासाठी 16.1 गुण मिळवणे आवश्यक होतं. मात्र त्याला 14 गुण मिळाल्याने संघातील स्थान गमवावं लागलं. आयपीएलमध्ये रायुडूने धमाकेदार कामगिरी करत 602 धावा फटकावल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली होती.

रैनाने अखेरचा वन डे सामना 25 ऑक्टोबर 2015 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. आयपीएलमध्ये तो चांगल्या फॉर्मात दिसून आला. रैनाने आतापर्यंत खेळलेल्या 223 वन डे सामन्यांमध्ये 5568 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे.

इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक

3 जुलैपासून भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-20 सामने आणि तीन वन डे सामने खेळणार आहे.

टी-20 सामने

पहिला टी-20 सामना : 3 जुलै

दुसरा टी-20 सामना : 6 जुलै

तिसरा टी-20 सामना : 8 जुलै

वन डे सामने

पहिला वन डे सामना : 12 जुलै

दुसरा वन डे सामना : 14 जुलै

तिसरा वन डे सामना : 17 जुलै

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध 1 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवण्यात येणार आहे. मात्र या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन , रोहित शर्मा , केएल राहुल , श्रेयस अय्यर , सुरेश रैना , एमएस धोनी (विकेटकीपर), दिनेश कार्तिक , युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव

संबंधित बातम्या :

... म्हणून भारतीय संघात रोहित शर्माऐवजी करुण नायरला संधी


सिद्धार्थ कौलला संधी, तीन मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर