जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केलेले भारतीय लष्कराचे जवान औरंगजेब यांच्यावर त्यांच्या सलानी या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय वीराला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते.


औरंगजेब यांच्या हत्येनंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करुन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुटुंबीयांनी या हत्येचा बदला घेण्याची मागणी केली आहे.

''मोदीजी, भावाच्या बदल्यात आम्हाला शंभर दहशतवाद्यांचा खात्मा पाहिजे, हे काम तुम्हाला जमत नसेल तर ते आम्ही करतो. आम्हाला सगळं माहित आहे. पण आम्ही सरकारच्या ताब्यात आहोत, तर सरकारकडे ही मागणी आहे, असं औरंगजेब यांचा भाऊ म्हणाला.


काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी औरंगजेब यांचं अपहरण करून नंतर त्यांची हत्या केली होती. या घटनेमुळे काश्मीर परिसरात मोठी खळबळ माजली होती. औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी गुरूवारी आपल्या घरी जात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं.

दहशतवाद्यांनी औरंगजेब यांचा एक व्हीडिओ देखील बनवला. ज्यामध्ये औरंगजेबला एका झाडाखाली बसवून दहशतवाद्यांकडून काही प्रश्न विचारले जात असल्याचं दिसत होतं. “हिजबुलचा कमांडर समीर टायगरच्या हत्येत तू सहभागी होतास का”, असं दहशतवाद्यांकडून औरंगजेब यांना विचारण्यात येत होतं.

भारतीय लष्कराच्या एका टीमने काही दिवसांपूर्वी हिजबुलचा दहशतवादी समीर टायगरला ठार केलं होतं. लष्कराच्या त्या टीममध्ये औरंगजेब यांचाही समावेश होता.

कोण होता समीर टायगर?

समीर टायगर 2016 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता. समीर पुलवामाचा रहिवासी होता. तसंच हिजबुलच्या अनेक हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. बुरहान वाणीनंतर समीरला काश्मीरच्या पोस्टर बॉयच्या रुपात सादर करण्यात आलं होतं. समीरने दहशतवादी वसीमच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन गोळीबारही केला होता. यामुळेच समीर टायगरवर 10 लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं.

काय आहे प्रकरण?

औरंगजेब हे 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान असून त्यांची पोस्टिंग 44RR शादीमार्गमध्ये होती. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतताना, दहशतवाद्यांनी मुघल रोडवर त्यांचं अपहरण केलं. औरंगजेब हे अँटी-टेरर ग्रुपचे सदस्य होते. औरंगजेब सकाळी नऊच्या सुमारास एका खासगी वाहनातून शोपियांच्या दिशेने येत होते. त्यावेळी कलमपोराजवळ अतिरेक्यांनी वाहन अडवत त्यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.