सातारा : पावसाला सुरुवात होताच घाटांची दयनीय अवस्था समोर आली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वरला जाणाऱ्या केळघर घाटातील रस्त्याच्या खालचा भाग सकाळी दरीत कोसळला. यामुळे रस्ता खचण्याचाही धोका निर्माण झाला आहे.

जो भाग दरीत कोसळला आहे, त्यावरून एखादं वाहन गेलं अथवा येऊन थांबलं तर हा रस्ताही दरीत कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दगडांनी हा भाग अडवला.



पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या आणि रस्ते खचण्याच्या अनेक घटना घडतात आणि याच घटना अपघातालाही निमंत्रण देतात. त्यामुळे वाहनचालकांनीही वाहन चालवताना सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.