मुंबई : भारतीय फुटबॉल संघाला (Indian Football Team) नवीन प्रशिक्षक (New Coach) मिळाला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने भारतीय फुटबॉल संघाच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. स्पेनच्या मॅनोलो मार्केझ यांच्यावर आता भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या फुटबॉल महासंघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मार्केझ यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे कोचिंगचा अनुभव असून तो भारतीय फुटबॉल संघासाठी उपयुक्त ठरू शकतो.
भारतीय फुटबॉल टीमला मिळाला नवा कोच
स्पेनच्या मानोलो मार्केझ यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून ते इगोर स्टिमॅक यांची जागा घेईल. शनिवारी झालेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (AIFF) कार्यकारी समितीच्या बैठकीत मार्केझ यांची कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एआयएफएफने एका निवेदनात सांगितलं आहे की, समितीच्या दिवसाच्या आधीच्या बैठकीत वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीवर चर्चा करण्यात आली आणि तत्काळ प्रभावाने या पदासाठी मनोलो मार्केझ यांची निवड करण्यात आली आहे.
मॅनोलो मार्केझ यांच्यावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी
भारतीय फुटबॉल संघाला नवा प्रशिक्षक मिळाला आहे. एआयएफएफने शनिवारी मॅनोलो मार्केझ यांची संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली. शनिवारी झालेल्या एआयएफएफच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे, उपाध्यक्ष एन.ए.हरीस, कोषाध्यक्ष किपा अजय आणि इतर सदस्य उपस्थित होते.
AIFF अध्यक्षांकडून मनोलो मार्केझ यांचं स्वागत
एआयएफएफचे (AIFF) अध्यक्ष कल्याण चौबे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, मॅनोलो मार्केझ हे संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक असतील. आम्ही एफसी गोवाचे आभारी आहोत, ज्यांनी राष्ट्रीय कर्तव्यासाठी मार्केझ यांना सोडण्याचा निर्णय घेतला. येत्या काही वर्षांत मार्केझ यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
मॅनोलो मार्केझ एफसी गोवाचे प्रशिक्षक
स्पॅनिश फुटबॉल कोच मॅनोलो मार्केझ हे सध्या एफसी गोवाचे प्रशिक्षक आहेत. ते गेल्या वर्षी या क्लबसोबत जोडले गेले होते. सध्या त्यांचा एफसी गोवासोबत करार आहे, शिवाय आता भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे सध्या मार्केझ यांना दुहेरी भूमिका बजावावी लागणार आहे. मार्केझ 2024-25 हंगामात एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत राहतील. भारतीय फुटबॉल संघाचे पूर्णवेळ प्रशिक्षक होण्यापूर्वी ते दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळतील. 2025 मध्ये मार्केझ यांचा एफसी गोवासोबतचा करार संपणार आहे. त्यानंतर ते भारतीय फुटबॉल संघाचे फुलटाईम कोच म्हणून जबाबदारी बजावतील.