मुंबई : आमचा खेळ आवडला नाही, तर आम्हाला शिव्या घाला, आमच्या कामगिरीवर टीका करा, पण स्टेडियममध्ये या असं भावनिक आवाहन भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने केलं आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री मुंबईच्या फुटबॉलरसिकांवर खूपच नाराज झाला आहे. त्याचं कारण आहे अंधेरीतल्या मुंबई फुटबॉल एरिनात नुकत्याच खेळवण्यात आलेल्या भारत आणि चीन तैपेई सामन्याकडे मुंबईकरांनी फिरवलेली पाठ.


हा सामना इन्टरकॉन्टिनेन्टल कप चौरंगी फुटबॉल स्पर्धेतला होता. त्यात भारताने चीन तैपेईचा ५-० असा धुव्वा उडवला. कर्णधार सुनील छेत्रीने गोलची हॅटट्रिक साजरी करुन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

पण भारतीय फुटबॉल संघाची ही कामगिरी पाहायला जेमतेम अडीच हजार प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते. या स्पर्धेत भारताचा पुढील सामना केनियाशी होत असून, सुनील छेत्रीच्या कारकीर्दीतला तो शंभरावा सामना आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुनील छेत्रीची पोस्ट वाचून त्याला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर विराट आणि सचिननेही देशातल्या क्रीडारसिकांना आवाहन केलं आहे.

..तर देशात क्रीडा संस्कृती निर्माण होईल : कोहली

माझा मित्र आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने केलेली पोस्ट मी वाचली. माझीही तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही स्टेडियममध्ये जाऊन भारतीय फुटबॉल संघाचा खेळ पाहा. तुम्हाला कोणताही खेळ आवडू दे, पण स्टेडियममध्ये जाऊन भारतीय फुटबॉल संघाला पाठिंबा द्या. भारताचा फुटबॉल संघ खूप गुणवान आहे. ते खूप मेहनत घेत आहेत. गेल्या काही मोसमात त्यांनी आपली कामगिरी उंचावली आहे. आज हा संघ एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. तुम्ही त्यांना स्टेडियममध्ये जाऊन पाठिंबा दिलात तर देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यात मदत होईल. हे आपल्या सगळ्यांचं व्हिजन आहे, असं विराटने व्हिडीओत म्हटलं आहे.


प्रेम आणि पाठिंबा खेळाडूंसाठी चांगलं टॉनिक : सचिन

खेळाडूंसोबत उभं राहून त्यांना पाठिंबा ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपल्या देशाचं नाव उंचावण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात. भारताचं प्रतिनिधित्त्व करणं हे त्यांचं स्वप्न असतं. मित्रांनो तुम्हाला आपल्या अॅथलीटचं समर्थन करायला हवं. समर्थकांकडून मिळणारं प्रेम आणि पाठिंबा हे खेळाडूंसाठी सर्वात चांगलं टॉनिक असतं. चला या संघासोबत उभं राहा आणि त्यांना पाठिंबा द्या. अॅथलीटना पाठिंबा देण्याची हीच वेळ आहे. माझ्याकडून सर्व खेळाडूंना खूप शुभेच्छा.