मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियानं वानखेडेच्या निर्णायक टी-ट्वेन्टीत विंडीजचा 67 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांची ही मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात विंडीजसमोर 241 धावांचं मोठं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला आठ बाद 173 धावांचीच मजल मारता आली. विंडीजकडून कर्णधार कायरन पोलार्डनं 68 धावा करुन एकाकी झुंज दिली. भारताकडून कुलदीप यादव, भुवनेश्वर आणि दीपक चहरनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करत पोलार्डचा निर्णय चुकीचा ठरवला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी 135 धावा जोडल्या. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. रोहित शर्मा 71 धावांवर तंबूत परतल्यानंतर विराट कोहली ऐवजी ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. मात्र, या संधीचं सोनं पंतला करता आले नाही. पोलार्डच्या गोलंदाजीवर पंत शून्यावर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने लोकेश राहुलच्या साथीने फटकेबाजी करत भारताला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराटने आक्रमक फटकेबाजी करत विंडीजच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. राहुल 91 धावा काढून अखेरच्या षटकात माघारी परतला.
याआधी रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीमुळे टीम इंडियानं 20 षटकात तीन बाद 240 धावांचा डोंगर उभारला. रोहित आणि राहुलनं सलामीच्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी रचली. रोहितनं 34 चेंडूत 71 धावा कुटल्या. त्यानंतर विराट आणि राहुलनं तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची उभारली. लोकेश राहुलनं 56 चेंडूत 91 धावा फटकावल्या तर विराट कोहलीनं अवघ्या 29 चेंडूत चार चौकार आणि सात षटकारांसह नाबाद 70 धावांची खेळी साकारली.

रोहित शर्माचा विक्रम -
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा रोहित हा आजवरचा तिसराच क्रिकेटर ठरला. शेल्डन कॉटरेलच्या गोलंदाजीवर मिडविकेटच्या दिशेनं षटकार खेचत रोहितनं आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीनं चारशे पेक्षा जास्त षटकार ठोकले होते. गेलच्या खात्यात 534 तर आफ्रिदीच्या खात्यात 476 षटकार जमा आहेत.

संबंधित बातम्या -

रणजीचा रणसंग्राम | विदर्भाला आघाडी, मुंबईची आघाडीकडे कूच, महाराष्ट्र अडचणीत

MS Dhoni | महेंद्रसिंह धोनी संघात कमबॅक कधी करणार? रवी शास्त्री म्हणातात....

Virat Kohli | क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर | ABP Majha