मुंबई :मुंबई : रणजी करंडकाच्या महासंग्रामाला कालपासून सुरुवात झाली. स्पर्धेचा पहिला दिवस मुंबईच्या फलंदाजांनी आणि विदर्भाच्या गोलंदाजांनी गाजवला होता.  रणजी करंडकाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ आणि मुंबईनं आपापल्या सामन्यात वर्चस्व गाजवलं. तर महाराष्ट्राचा संघ मात्र अडचणीत सापडला आहे.


शम्स मुलानीची अष्टपैलू कामगिरी


शम्स मुलानीची अष्टपैलू कामगिरी मुंबई-बडोदा रणजी करंडक सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. डावखुऱ्या शम्सनं 99 धावांत पाच विकेट्स घेऊन बडोद्याची पहिल्या डावात दाणादाण उडवली. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर बडोद्याची नऊ बाद 301 अशी अवस्था झाली आहे. त्याआधीशम्सच्या 89 धावांच्या खेळीमुळे मुंबईला पहिल्या डावात 431 धावांचा डोंगर उभारता आला. या सामन्यात मुंबई अजूनही 130 धावांनी आघाडीवर आहे.


मुंबई - 431
बडोदा- 301/9  (दुसऱ्या दिवसअखेर)

(बडोदा 130 धावांनी पिछाडीवर)

 

विदर्भाला पहिल्या डावात आघाडी

गणेश सतिश आणि मोहित काळेच्या दमदार भागिदारीमुळे विदर्भानं आंध्रविरुद्ध पहिल्या डावात आतापर्यंत धावांची 57 आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विदर्भानं चार बाद 267 धावांची मजल मारली होती. गणेश सतीशनं 16 चौकारांसह नाबाद 113 धावांची खेळी उभारली. तर मोहित काळे 82 धावा काढून बाद झाला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी  184 धावांची भागीदारी रचून विदर्भाला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली.


आंध्र - 211
विदर्भ - 268/4   (दुसऱ्या दिवसअखेर)



(विदर्भ 57 धावांनी आघाडीवर)

महाराष्ट्र अडचणीत

विदर्भ आणि मुंबईचे संघ चांगली कामगिरी बजावत असतानाच महाराष्ट्राचा संघ मात्र विदर्भाविरुद्धच्या सामन्यात अडचणीत सापडला आहे. आज दुसऱ्या दिवशी हरयाणाचा डाव 411 धावांत आटोपला. महाराष्ट्राच्या अनुपम संकलेचा आणि सत्यजीत बच्छावनं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर खेळताना महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राची चार बाद 88 अशी अवस्था झाली होती.

हरयाणा -411
महाराष्ट्र -88/4 (दुसऱ्या दिवसअखेर)

(महाराष्ट्र 313 धावांनी पिछाडीवर)