मुंबई :  राज्यात आज मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील नरसोबावाडी, सांगलीतील नरसोबाची वाडी येथील दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.


श्री क्षेत्र नृसिंहवाडीत उसळला भक्तांचा महापूर

संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या श्री दत्त जयंती उत्सवास मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. यानिमित्त श्री दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडीत भक्तांचा महापुर आला आहे. पहाटे तीन वाजता मंदिराच्या गाभाऱ्याचे द्वार उघडल्यानंतर 4 वाजता श्री दत्त महाराजांची पहाटेची काकडआरती झाली. यावेळी पहाटेपासूनच भक्तांनी दत्त मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दत्त जयंती मुळे होणारी संभाव्य गर्दी पाहता श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील देवस्थान कमिटीने दर्शन रांगा सह दत्त महाराजांच्या दर्शनाची खास सोय केली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती त्यामुळे नृसिंहवाडीचा दत्त जयंती सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू झाला. आज दिवसभर दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाही संपन्न होणार आहेत.

भाविकांची माणगाव दत्त मंदिरात मांदियाळी
सिंधुदुर्ग जिल्यातील कुडाळ तालुक्यातील श्री क्षेत्र माणगाव येथे दत्त जयंती निमीत्ताने भाविकांची मोठी गर्दी दत्त जन्म पाहायला मिळाली. प.पू.टेंब्ये स्वामींचे जन्मस्थान असलेल्या माणगावात भक्तांची मांदियाळी दत्त जयंतीच्या निमित्ताने पाहायला मिळाली. गोवा, कर्नाटक, गुजरात मधून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. दत्त मंदिरात कीर्तन सुरू होते. सायंकाळी 6 वाजता दत्त जन्म सोहळा संपन्न झाला. दत्त जन्म सोहळ्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामस्मरण सुरू झालं आणि सर्व दत्त भक्तांसाठी लहान दत्त महाराजांचं दर्शन खूल करण्यात आलं. दत्त जन्म सोहळा पाहण्यासाठी आठ ते दहा हजार भाविकांची गर्दी यावेळी होती.

श्री क्षेत्र औदुबंर येथे श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न
दिगंबरा दिगबंरा श्रीपाद वल्लभ दिगबंराच्या गजरामध्ये श्री क्षेत्र औदुबंर येथे श्री दत्त जन्मकाळ संपन्न झाला. यावेळी मंदीर परीसरामध्ये भाविकांची उलोट गर्दी होती. आज दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्रा बरोबर परराज्यातून अनेक भाविक श्री क्षेत्र औदुबंर येथे दाखल झाले होते. यंदा प्रथमच लाखाच्या वर भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे 5 वाजल्यापासून दत्त मंदीरामध्ये गर्दी होत होती. दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदीर परीसर फुलांनी बहरून गेला होता दिवसभरामध्ये भाविकांची संख्या मोठी होती. भाविकांनी दत्त पादुकांचे दर्शन घेतले.

दत्तजयंतीनिमित्त हिंगोली शहरातील खटकाळी परिसरात असलेल्या शक्तीब्रम्हा आश्रमातील  दत्त मंदिर परिसरात दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला,गेल्या 40 वर्षांपासून याठिकाणी,विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा उत्सव साजरा करण्यात येतो,यंदाच्या वर्षी देखील दहा दिवस अगोदर पासून या कार्यक्रमाची तयारी करण्यात येत होती,आज सकाळी पाच वाजता सामूहिक गायत्री होमहवन,अभिषेक  व दत्त आरती संपन्न झाली  या  नंतर, दत्त मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या, दरम्यान मंदिर प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.