India vs South Africa T20i Series :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच प्रोटीज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरता न आल्यामुळे लुंगी एनगिडीला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी ब्युरोन हेंड्रिक्सला संघात संधी मिळाली  आहे. डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे लुंगी एनगिडी टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. आता तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी स्वत:ला तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल.


दोन वर्षांनी हेंड्रिक्सला संधी मिळणार


लुंगी एनगिडीच्या वगळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघात सामील झालेला 33 वर्षीय हेंड्रिक्स दोन वर्षांहून अधिक काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. जुलै 2021 मध्ये तो अखेरचा सामना खेळला होता. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत एक कसोटी, आठ एकदिवसीय आणि 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हेंड्रिक्सचा टी-20 आंतरराष्ट्रीय करिअर  सरासरी राहिला आहे. त्याने 19 सामन्यात 25 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 25 बळी घेतले आहेत. मात्र, या काळात त्याने 9.19 च्या इकॉनॉमी रेटने धावाही दिल्या आहेत.






टी-20 मालिकेत गोलंदाजी कमकुवत राहू शकते


भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेने आपला सर्वात महत्त्वाचा गोलंदाज कागिसो रबाडालाही विश्रांती दिली आहे. आता लुंगी एनगिडी बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाजी आक्रमण थोडे कमकुवत दिसेल. आता या संघातील वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जेराल्ड कोएत्झी, नांद्रे बर्जर, ओटनील बार्टमन आणि लिझार्ड विल्यम्स यांच्यावर असेल. या चार वेगवान गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही.


मालिका 10 डिसेंबरपासून सुरू होत आहे


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला उद्या 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना डर्बनमध्ये खेळवला जाईल. यानंतर 12 डिसेंबरला गेबेरहा आणि 14 डिसेंबरला जोहान्सबर्ग येथे टी-20 सामने होणार आहेत. यानंतर दोन दिवसांनी, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल, जी 17 ते 21 डिसेंबर दरम्यान चालेल. 26 डिसेंबरपासून हे संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या