मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी गुरुवारी (29 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. विश्वचषकानंतर धोनीने लागोपाठ दुसऱ्या मालिकेतून माघार घेतली आहे. विराटच्या नेतृत्वाखालील या संघात रिषभ पंतकडेच यष्टिरक्षणाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिका आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात ट्वेन्टी-20 मालिकेपासून करेल. ही मालिका तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची असून पहिला सामना धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियममध्ये 15 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येईल. टी20 मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 2 ऑक्टोबरपासून तीन कसोटी मालिकला सुरुवात होईल.

महेंद्र सिंह धोनीने काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीशिवाय भुवनेश्वर कुमारलाही संघात स्थान मिळालेलं नाही, तर श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. तसंच हार्दिक पंड्याही पुन्हा मैदानावर दिसेल.


भारताचा टी20 संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर आणि नवदीप सैनी.

भारत-दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला टी20 सामना - 15 सप्टेंबर - धर्मशाला

दुसरा टी20 सामना - 18 सप्टेंबर - मोहाली

तिसरा टी20 सामना - 22 सप्टेंबर - बंगळुरु