WTC 2021, 2 Innings Highlight: न्यूझीलँड जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव करत न्यूझीलँड संघानं पहिल्या कसोटी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताचा दुसरा डाव 170 धावांवर गुंडाळला गेल्यानं न्यूझीलँडला 139 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान न्यूझीलँडच्या संघानं 8 गडी राखून पार केलं. न्यूझीलँडकडून कर्णधार केन विलियमसन आणि रॉस टेलरनं विजयी खेळी केली. विलियमसननं शानदार अर्धशतक ठोकत 52 धावा केल्या तर टेलरनं 47 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. दोन डावांमध्ये सात विकेट घेणाऱ्या कायले जेमिसनला सामनावीराचा खिताब देण्यात आला.
139 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलँडच्या सलामीवीरांना भारतीय गोलंदाजांनी लवकर बाद केलं. लॅथम 9 तर कॉन्वे 19 धावांवर बाद झाला. मात्र यानंतर आलेल्या केन विलियमसन आणि रॉस टेलरनं कुठलीही पडझड न होऊ देता संघाला विजय मिळवून दिला.
त्याआधी न्यूझीलँडच्या गोलंदाजांच्या वादळासमोर भारतीय फलंदाज टिकू शकले नाहीत. साऊदी, बोल्टच्या दमदार गोलंदाजीमुळे भारताचा दुसरा डाव 73 षटकात 170 धावांवर आटोपला. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली.
दुसऱ्या डावातही फलंदाजांनी टाकल्या नांग्या
कालच्या 2 बाद 64 धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारताने उपाहारापर्यंत अर्धा संघ बाद झाला होता. विराट कोहली (13), चेतेश्वर पुजारा (15) आणि अजिंक्य रहाणेला (15) धावांवर बाद झाले. त्यानंतर ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सांभाळला. पंतसोबत खेळपट्टीवर स्थिरावलेला रवींद्र जाडेजा 16 धावांवर बाद झाला. तर 70व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात ऋषभ पंत 41 धावांवर बाद झाला. पंतनंतर अश्विनही तग धरु शकला नाही. बोल्टने त्याला टेलरकरवी झेलबाद केले. त्यानंतर भारताचे तळाचे फलंदाजही स्वस्तात बाद झाले. न्यूझीलॅंडकडून दुसऱ्या डावात टिम साऊदीने 48 धावांत 4 विकेट घेतल्या तर बोल्टने 3, जेमीसनने 2 तर नील वॅगनरने 1 विकेट घेतली.
भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात अजिंक्य रहाणे 49 तर विराट कोहली 44 धावा केल्या होत्या. काईल जेमीसन भारताचे पाच गडी बाद केले होते. त्यानंतर न्यूझीलॅंजचा पहिला डाव 249 वर आटोपला होता. न्यूझीलॅंडकडून डेव्हॉन कॉन्वे 54, केन विल्यमसन 49 धावा केल्या होत्या. मोहम्मद शमीनं चार तर इशांत शर्माने 3, अश्विननं दोन विकेट घेतल्या होत्या.