WTC Final Updates: भारत आणि न्यूझीलंड संघांत इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना सुरु आहे. आज या सामन्याचा शेवटचा दिवस आहे. टीम इंडियानं पहिल्या डावात 217 धावा केल्यानंतर न्यूझीलॅंडनं 249 धावा करत 32 धावांची आघाडी पहिल्या डावात घेतली. दुसऱ्या डावातही भारतीय संघाची अवस्था चिंताजनक आहे. आता उपाहारापर्यंत टीम इंडियाचा अर्धा संघ बाद झाला आहे. भारतानं 5 बाद 130 धावा केल्या आहेत. सध्या ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा मैदानात आहेत. आज आणखी 73 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जर भारतीय संघानं आणखी काही वेळ खेळपट्टीवर तग धरली तर सामना अनिर्णीत होणार हे स्पष्ट आहे. आणि जर सामना अनिर्णीत झाला तर कसोटी विश्वविजेता कसा ठरणार असा सवाल प्रत्येकाला आहे. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन्सची घोषणा केली आधीच केली आहे. त्यानुसार ही कसोटी अनिर्णीत राहिली किंवा 'टाय' झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येणार आहेत.  या फायनलसाठी आयसीसीने  राखीव दिवसाचाही घोषणा केली होती. अपेक्षेप्रमाणे पाऊस आल्यानं पहिल्या दिवसाचा खेळ होऊ न शकल्यानं आजच्या 23 जून राखीव दिवशीही सामना सुरु आहे.  


2019 मध्ये कसोटी विजेतेपदाला सुरुवात
आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपदाची सुरुवात ऑगस्ट 2019 मध्ये झाली होती. परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे चॅम्पियनशिपचे बहुतांश सामने खेळवण्यात आले नाहीत. एवढंच नाही तर मागील वर्षी  आयसीसीने कसोटी विजेतेपदाच्या नियमांमध्ये बदलही केले होते. या स्पर्धेत भारताची कामगिरी उत्तम होती. भारताने 520 अंकांसह चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. तर न्यूझीलंडचा संघ 420 अंकांसह दुसऱ्या स्थानावर राहिल्याने त्याने अंतिम फेरीत धडक मारली.


मॅच ड्रॉ झाल्यास पुरस्काराची रक्कम अर्धी अर्धी
जर सामना ड्रॉ झाला तर  2.4 मिलियन अमेरिकन डॉलरच्या पुरस्कारच्या रकमेला दोन्ही संघांना समान वितरण केलं जाणार आहे. अशात भारत आणि न्यूझीलॅंडच्या संघांना जवळपास   8.78 कोटी रुपयांची पुरस्काराची रक्कम मिळणार आहे. या फायनलच्या विजेत्या संघाल 'गदा' देखील दिली जाणार आहे. आधी ही गदा प्रत्येक वर्षी टेस्ट टीम रॅंकिंगमध्ये टॉपवर राहणाऱ्या संघाला दिला जायचा. आता कसोटी विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला ही गदा मिळणार आहे. जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघ ही गदा देखील शेअर करणार आहेत.  


भारतीय संघ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार
हा कसोटी विश्वचषकाचा सामना झाल्यानंतर भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी रवाना होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संघातील सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये दहा दिवस क्वॉरन्टीन व्हावं लागेल. मात्र क्वॉरन्टीन काळात खेळाडूंना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.