India vs New Zealand, 3rd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील मुंबईमधील तिसऱ्या सामन्यात (India vs New Zealand, 3rd Test) न्यूझीलंडचा स्टार फिरकी गोलंदाज एजाज पटेलने अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ज्याचा एजाज पटेलने चांगला वापर केला. या सामन्यातील त्याच्या शानदार गोलंदाजीनंतर तो विशेष यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. वानखेडे स्टेडियमवर पहिल्या डावात एजाज पटेलने 21.4 षटकात 103 धावा देत 5 बळी घेतले. सामन्याच्या दुसऱ्या डावात 4 विकेट घेताच त्याने इयान बोथमचा खास विक्रम मोडीत काढला.
इयान बोथमचा विक्रम मोडला
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात एजाज पटेलने चौथी विकेट घेताच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावावर 23 बळींची नोंद झाली. वानखेडेवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात त्याने मोठी कामगिरी केली आहे. भारतातील कोणत्याही एका ठिकाणी सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या विदेशी गोलंदाजांच्या यादीत एजाज पटेल पहिला आला आहे. या यादीत अनेक दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे. त्याने इयान बोथमचा विक्रम मोडला आहे. इयान बोथमने वानखेडे स्टेडियमवर 22 कसोटी विकेट घेतल्या.
मुंबईत एजाजचा दबदबा राहिला
एजाज पटेलने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नेहमीच चमकदार गोलंदाजी केली आहे. वानखेडे स्टेडियमवरील हा त्याचा दुसरा सामना आहे. याआधीच्या सामन्यात त्याने दोन्ही डावात एकहाती 14 बळी घेतले होते. ज्यात त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात 119 धावांत 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्या सामन्याच्या पहिल्या डावात अजाज पटेलनेही शानदार गोलंदाजी करत 106 धावांत 4 बळी घेतले.
ज्याचा पोपट करण्याचा प्रयत्न केला, त्यानंच गेम केला!
दुसरीकडे, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यात पार पडला. या कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव झाला होता. टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंत आणि एजाज पटेल यांच्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये पंत म्हणत आहे की, अरे याला (एजाज पटेल) हिंदी भाषा येते माहितच नाही. पुण्यातील कसोटीत न्यूझीलंडच्या डावाच्या 78व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर सुंदर गोलंदाजी करत होता. त्याच्यासमोर एजाज पटेल होता. चेंडू टाकण्यापूर्वी पंतने सुंदरला पूर्ण लांबी आणि ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्यास सांगितले. सुंदरने हे करताच एजाज पटेलने बॅट फिरवली आणि लाँग-ऑनच्या दिशेने चौकार मारला. पंतलाही आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात आले. यामुळे तो त्याच्या बचावात ‘ अरे याला (एजाज पटेल) हिंदी येतंय’ असं म्हणताना दिसून आला. त्यानंतर अवघ्या 2 चेंडूनंतर वॉशिंग्टन सुंदरने एजाज पटेलला 4 धावांवर क्लीन बोल्ड केले. मुंबईत तोच एजाज पटेल टीम इंडियाचा कर्दनकाळ झाला.
इतर महत्वाच्या बातम्या