WTC 2025 Points Table Updated after Ind vs Nz Test Series : न्यूझीलंडने टीम इंडियाचा भारतात 3-0 असा पराभव करून इतिहास रचला आहे. टीम इंडिया या मालिकेत एकही सामना जिंकू शकली नाही. भारतात सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह टीम इंडियाला आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम पॉइंट टेबलमध्ये मोठा धक्का बसला आहे. आता नंबर एक वरून टीम इंडिया खाली आली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे.






मुंबई कसोटीपूर्वी टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होती, मात्र या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. जो टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. टीम इंडियाला आता गुणतालिकेत 58.33 टक्के गुण आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाच्या पराभवाचा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला चांगलाच फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघ आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आला आहे.






घरच्या मैदानावर इतक्या वाईट रीतीने पराभूत झाल्यानंतर आता टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू होणार आहे. ज्यामध्ये दोन्ही संघांचे पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. आता टीम इंडियाला जर स्वबळावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठायची असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच पैकी चार टेस्ट मॅच जिंकाव्या लागतील. जे इतके सोपे होणार नाही. अशा स्थितीत टीम इंडियाच्या अडचणी काहीशा वाढू लागल्या आहेत.  






सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 235 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात भारताने 263 धावांची मजल मारत 28 धावांची आघाडी मिळवली होती. न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला आणि भारताला 147 धावांचे लक्ष्य मिळाले. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारत दुसऱ्या डावात 121 धावांवरच ऑलआऊट झाला. अशाप्रकारे न्यूझीलंडने मुंबई कसोटी 25 धावांनी जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घातली.


हे ही वाचा -


Rishabh Pant Wicket Controversy : आऊट की नॉट आऊट? पंतच्या विकेटवरून गदारोळ, थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे पेटला वाद, नेमकं काय घडलं?


Ind vs nz 3rd Test : मुंबईतही भारताचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने रचला इतिहास; मालिका 3-0 ने जिंकली, भारतात पहिल्यांदाच घडलं