ऑकलंड : टी-20 मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणारा भारतीय संघ वन-डे मालिकेत मात्र अपयशी होताना दिसतोय. दुसऱ्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 22 धावांनी मात करत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलीय. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 274 धावांचं आव्हान भारतीय संघाला गाठता आलं नाही. भारताकडून श्रेयस अय्यर आणि अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा-नवदीप सैनीने संघर्ष केला. मात्र, त्यांचे प्रयत्न सफल झाले नाही.

सलग दुसऱ्या वन-डे सामन्यातही भारताच्या सलामीवीरांनी निराशा केली. मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी झटपट माघारी परतली. यानंतर मधल्या फळीतले फलंदाजही धडपडताना दिसले. कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. दरम्यान, रविंद्र जाडेजाने शार्दुल ठाकूर आणि त्यानंतर नवदीप सैनीसोबत महत्वपूर्ण भागीदारी जोडत संघाचं आव्हान कायम ठेवलं. मात्र, निर्णायक क्षणी भारताने विकेट गमावल्याने सलग दुसरा सामनाही भारताच्या हातून गेला. जाडेजाने 55 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही अर्धशतकी खेळी केली. याव्यतिरीक्त एकाही खेळाडूला लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही.

अखेरच्या षटकात न्यूझीलंडची धावपट्टी -

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स या सलामीवीरांनी न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. चहलने निकोलस याला 41 धावांवर बाद कर भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर गप्टिल आणि ब्लंडेल यांनी संघाला दीडशतकाच्या जवळ पोहोचवले. ब्लंडेलची विकेट शार्दुलने घेतली. तर, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गप्टिल धावाबाद झाला. त्याने 79 धावा केल्या. रॉस टेलर आणि कायन जेमिन्सन यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडला 273 धावसंख्या उभारली. पहिल्या वन-डे सामन्याच्या तुलनेत ऑकलंडच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळवलं. मात्र, अखेरच्या काही षटकांमध्ये जास्त धावा गेल्या. गोलंदाजित युजवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूर यांनी चांगली गोलंदाजी केली. यानंतर शार्दुल ठाकूरने टॉम ब्लंडलला बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला.

Sachin Tendulkar | नवी मुंबईत 'तेंडुलकर मिडलसेक्स'ची क्रिकेट अॅकॅडमी | ABP Majha